Join us

सरोज खान बॉलिवूडमध्ये 'मास्टरजी' म्हणून होत्या प्रचलित, जाणून घ्या त्यांचा जीवन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 10:01 AM

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. गेल्या २० जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचा जन्म  २२ नोव्हेंबर १९४८  साली झाला होता. सरोज खान हे बॉलिवूड मधील डान्स डायरेक्टरच्या यादीतलं अव्वल नाव होते. किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल होते. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षीच 'नजराना' या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ ला त्यांनी 'डान्स मास्टर' म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, 'गीता मेरा नाम'. तेव्हापासून ते आज पर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर त्यांनी नाचवलं होते. 

कोरिओग्राफर सरोज खान मास्टरजी म्हणून ओळखल्या गेल्या. गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सरोज खान यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केले. या काळात डान्सच्या फॉर्म्समध्ये, स्टाइलमध्ये खूप परिवर्तन झाले. हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर कित्येक नायिका आल्या. या नायिकांना जिथे कोरिओग्राफीचा स्पर्श झाला तिथे या नायिका बहरल्या. हिंदी इण्डस्ट्रीमधले सरोज खान हे असे नाव होते, की ज्यांनी या प्रत्येकी बरोबर काम केले आहे. साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, माला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. 

'देवदास', 'श्रृंगारम' आणि 'जब वी मेट' या सिनेमातील उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आठहून अधिक  फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांना मिळाली होती. 'लगान' या सिनेमासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला होता. सरोज खान यांनी अनेक रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती. 'नच बलिए', 'उस्तादों के उस्ताद', 'नचले वे विद सरोज खान', 'बूगी-वूगी', 'झलक दिखला जा' या शोजचा समावेश आहे. सरोज खान यांनी हिरो, फिजा, ताल, याराना, मोहरा, बाजिगर, तेजाब, चालबाझ, सैलाब, डर, आईना, साथिया, मि. इंडिया, देवदास, खामोशी द म्युझिकल, जब वी मेट अशा सुमारे २०० चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले होते. 

सरोज खान यांचे लग्न केवळ १३ व्या वर्षी झाले होते. ४३ वर्षांचे डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी इस्लाम कबूल करून लग्न केले होते. बी सोहनलाल यांचे पहिले लग्न झाले होते. तसेच ते चार मुलांचे वडिलही होते. सरोज खान यांनी आपल्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी शाळेत जात होती. मला नाही माहिती की लग्नाचं महत्त्व काय होतं. एके दिवशी मास्टर सोहनलाल यांनी गळ्यात एक धागा बांधला, त्यांना वाटलं की त्यांचे लग्न झाले आहे. सरोज खान यांच्या लग्नात खूप अडचणी आल्या. सरोज खान यांना माहिती नव्हते की त्याचे पती यांचे पूर्वीच लग्न झाले आहे. मुलगा राजू खान यांच्या जन्मानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा झाला. तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण त्याचा आठ महिन्यानंतर मृत्यू झाला. 

सरोज खानच्या मुलांना त्यांच्या पतीने नाव देण्यास नकार दिला. यामुळे दोघे वेगळे झाले. सोहनलाल याना हार्ट अटॅक आल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या दरम्यान, त्यांच्या मुलगी कुकूचा जन्म झाला. सरोज खान यांनी दोघांचे पालन पोषण एकट्यानेच केले.

टॅग्स :सरोज खानमाधुरी दिक्षितश्रीदेवी