Join us  

Satish Kaushik : “प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 2:18 PM

Satish Kaushik : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत. गेल्या ९ मार्चला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वडिलांचे पार्थिव घरी आणले तेव्हा वंशिकाने त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं होतं...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik ) आज आपल्यात नाहीत. गेल्या ९ मार्चला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर काल १३ एप्रिल २०२३ रोजी त्यांचा पहिला जन्मदिवस साजरा करण्यात आला. सतीश यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी यानिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. इंडस्ट्रीतले अनेक बडे कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. शिवाय सतीश कौशिक यांचे कुटुंबिय, त्यांची पत्नी शशी आणि मुलगी वंशिकाही उपस्थित होते. यावेळी सतीश कौशिक यांची ११ वर्षांची लेक वंशिकाने वडिलांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. तिचं हे पत्र ऐकताना प्रत्येकाचे डोळे पाणावले. अनुपम खेर यांनाही अश्रू अनावर झालेत.

वडिलांचे पार्थिव घरी आणले तेव्हा वंशिकाने त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलं होतं. अनुपम खेर यांनी या पत्रामागची कहाणी सांगितली.  'जेव्हा सतीशला घरी आणलं गेलं तेव्हा वंशिकाने मला एक पत्र दिले होतं. तुम्ही हे वाचू नका, फक्त पप्पांच्या बाजूला ठेवा, असं ती मला म्हणाली होती,' असं त्यांनी सांगितलं. ते पत्र वंशिकाने कार्यक्रमात वाचून दाखवलं आणि तिचं ते पत्र ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

पत्रात वंशिकाने लिहिले,'हॅलो पापा, तुम्ही आता आमच्यात नाही पण मला माहीत आहे की मी तुमच्यासाठी नेहमीच उभे राहीन.  तुमच्या खूप मित्रांनी मला स्ट्रॉन्ग राहा, असं सांगितलंय. पण मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते. असं काही होणार आहे, हे मला ठाऊक असंत तर मी शाळेतच गेली नसते. मी तुमच्यासोबत आणखी वेळ घालवला असता. काश, मी तुम्हाला एकदा मिठी मारू शकले असते. पण आता तुम्ही निघून गेला आहात. चित्रपटांमध्ये जशी जादू होते ना, तशी व्हावी असं वाटतंय. आता होमवर्क केला नाही म्हणून  आई रागवेल तेव्हा मला कोण वाचवेल, माहित नाही. मला आता शाळेतही जावं वाटत नाही...

प्लीज पापा, रोज माझ्या स्वप्नात या... आम्ही तुमच्यासाठी पूजा ठेवली आहे. तुम्ही पुनर्जन्म घेऊ नका. कारण आपण दोघे ९० वर्षांनी पुन्हा...पापा, प्लीज मला विसरू नका आणि मी सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही. जेव्हा मी माझे डोळे बंद करेल, माझे हात हृदयाजवळ नेईल, तेव्हा मला फक्त तुम्ही दिसाल. तुमचा आत्मा माझ्या हृदयात असेल.  जेव्हा मला मार्गदर्शकाची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल. माझे पापा हे जगातील बेस्ट डॅड होते....'

टॅग्स :सतीश कौशिकअनुपम खेरबॉलिवूड