मुलाचे निधन झाल्यावर 16 वर्षांनी सरोगसीने झाली सतिश कौशिक यांना मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 03:19 PM2021-04-13T15:19:00+5:302021-04-13T15:19:53+5:30
सतिश कौशिक यांचा मुलगा दोन वर्षांचा असताना त्याचे निधन झाले होते तर त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी प्रचंड आजारी होती.
अनेक सिनेमांचे दिग्दर्शन करणारे आणि पडद्यावर अनेक यादगार व्यक्तिरेखा जिवंत करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा आज वाढदिवस. ‘मिस्टर इंडिया’त कॅलेंडरची भूमिका साकारणारे सतीश कौशिक आज 65 वर्षांचे झालेत. 13 एप्रिल 1956 रोजी जन्मलेल्या सतीश यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. याचसोबत अभिनक्षेत्रातही पदार्पण केले.
रिल लाईफमध्ये आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारे सतीश यांचे रिअल लाईफ दु:खानी भरलेले आहे. दोन वर्षांचा असताना त्यांचा मुलगा शानूचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूने सतीश पार कोलमडून गेले होते. मुलाच्या मृत्यूच्या 16 वर्षानंतर 2012 साली सरोगेसीद्वारे सतीश यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यांची मुलगी त्यांचा जीव की प्राण आहे. त्यांची मुलगी वंशिका काही दिवसांपूर्वी आजारी पडली होती. त्यावेळे ते पूर्णपणे कोलमडून गेले होते.
सतिश कौशिक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच वेळी त्यांची मुलगी देखील रुग्णालयात दाखल होती. काही केल्या त्यांच्या मुलीचा ताप उतरत नव्हता आणि ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलीला त्यांना भेटता येत नव्हते. त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. वंशिकामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली होती. असे असले तरी तिचा ताप मात्र वाढत होता. फोनवरून लेकीचा रडण्याचा आवाज ऐकून सतीश कौशिक यांचे काळीज तुटत होते. माझ्या लेकीसाठी प्रार्थना करा, असे सतीश कौशिक यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले होते.
वंशिकाला रुग्णालयातून घरी डिस्चार्ज करण्यात आल्यावर सतिश कौशिक यांनी तिचा फोटो शेअर करत तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले होते.