बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचं पार्थिव दिल्लीहून मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरात आणण्यात आलं. सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दिवंगत अभिनेते पंचत्त्वात विलीन झाले आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व ११ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सतीश यांच्या पत्नी शशी या सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. त्या एक निर्मात्या आहेत. १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने सतीश व शशी यांना मुलगी झाली. वयाच्या ५६व्या वर्षी सतीश पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे.
सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.