आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशक (Satish Kaushik) यांचं नुकतंच निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सतीश कौशक यांच्या निधनामुळे कलाविश्वावर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली असून सध्या चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यामध्येच काही जणांनी त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळाला दिला आहे.
सतीश कौशिक यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'मिस्टर इंडिया'. या चित्रपटात त्यांनी साकारलेली कॅलेंडर ही भूमिका विशेष गाजली. परंतु, त्यांच्या या भूमिकेला कॅलेंडर हे अजब नाव कसं काय देण्यात आलं? हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. विशेष म्हणजे हे नाव देण्यामागेही एक किस्सा आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांना ही भूमिका कशी मिळाले ते जाणून घेऊ
कशी मिळाली कॅलेंडरची भूमिका?
सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती होत असतानाच ते या चित्रपटासाठी ऑडिशनही घेत होते. परंतु, त्यांना या चित्रपटात काम कराची इच्छा असल्यामुळे ऑडिशनला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला ते काही ना काही कारण देऊन नकार देत होते. इतकंच नाही तर या चित्रपटात काम करण्यासाठी ते इतके उत्सुक होते की अगदी नोकराची भूमिकाही करण्यास ते तयार झाले. आणि, अखेर कॅलेंडर ही भूमिका त्यांच्या पदरात पडली.
कसं मिळालं कॅलेंडर नाव?
सतीश कौशिक लहान असताना त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी एक व्यक्ती यायचे. त्यांच्या तोंडात कायम कॅलेंडर हा शब्द असायचा. कोणत्याही वाक्यात ते कॅलेंडर या शब्दाचा वापर करायचे. मिस्टर इंडियामधील नोकराच्या भूमिकेसाठी नाव शोधत असतानाच त्यांना या नावाची आठवण झाली आणि त्यांनी स्वत:च्या भूमिकेचं नाव कॅलेंडर असं ठेवलं. ‘मेरा नाम है कॅलेंडर, मै चला किचन के अंदर’ हा त्यांचा डायलॉगही विशेष लोकप्रिय झाला.
दरम्यान, सतीश कौशिक यांना दिल्ली एनसीआरमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचे प्राण वाचवण्यास डॉक्टरांना अपयश आलं. अभिनेता आणि सतीश कौशिक यांचा जवळचा मित्र अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.