७६ वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा सध्या चर्चेत आले आहेत. नुकताच मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. या सीझनमधील कुलभूषण खरबंदा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्यांनी मिर्झापूर २मध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या वडील सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. सत्यानंद त्रिपाठी खूपच लबाड आणि मजेशीर आहेत. एकीकडे त्यांच्या कामाचे कौतूक होत आहे तर दुसरीकडे काही लोक त्यांना शिवीगाळ करत आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे.
कुलभूषण खरबंदा यांनी इंस्टा स्टोरीवर म्हटले की, तुमच्या लोकांचे प्रेम पाहून खूप छान वाटले. मात्र काही असेदेखील आहेत जे मला मेसेजमध्ये शिवीगाळ करत आहेत. ते पाहून मला वाईट वाटले. मी तुम्हा सर्वांना गुड लक देतो. डिजिटल जगात मी नवीन आहे आणि आता शिकतो आहे.
पहिल्या सीझनमध्ये गाजलेल्या या वेबसीरीजमध्ये अली फजलसोबतच, पंकज त्रिपाठी दिवेन्दू शर्मा, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गलसारखे कलाकारही आहे. हा शो उत्तरप्रदेशातील मिर्झापूर आणि तेथील खानदानावर आधारित आहे.