सौंदर्या रजनीकांतने म्हटले, ‘आप्पा’ला दिग्दर्शित करणे माझे भाग्यच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 3:33 PM
दिग्दर्शक सौंदर्या रजनीकांत हिच्या मते, वडील रजनीकांत (आप्पा) यांची भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वभाग्यच म्हणावे ...
दिग्दर्शक सौंदर्या रजनीकांत हिच्या मते, वडील रजनीकांत (आप्पा) यांची भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वभाग्यच म्हणावे लागेल. सौंदर्याने २०१४ मध्ये आलेल्या आणि सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कोचडीयान’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात उडी घेतली. सौंदर्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मला एकदा त्यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजते. अखेर किती लोकांना त्यांना ‘कॅमेरा, अॅक्शन आणि कट’ असे म्हणण्याची संधी मिळाली असेल? त्यांच्यासोबत एकदा केलेले काम आयुष्यभरासाठी स्मरणात राहते’, असेही सौंदर्याने सांगितले. यावेळी सौंदर्याने वडील रजनीकांत यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची शक्यता नाकारली नाही, परंतु आगामी काळात सध्या तरी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी कुठलीही योजना आखली नसल्याचे तिने स्पष्ट केले. सौंदर्याने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, ‘माझ्या वडिलांच्या मते त्यांच्या आगामी चित्रपटाची पटकथा मी लिहावी.’ मात्र सौंदर्याने आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या दोन्ही चित्रपटांची कथा अन्य व्यक्तींनी लिहिली आहे. सध्या सौंदर्या ‘व्हीआयपी-२’च्या यशाचा आनंद घेत आहे. यावेळी तिने धनुषचे आभार मानताना म्हटले की, ‘एका सीक्वल चित्रपटाबरोबर अनेक प्रकारच्या जबाबदाºया असतात. कारण पहिल्या भागाशी याची तुलना केली जाणे शक्य असते. त्यामुळे आम्हाला सुरुवातीपासूनच या चित्रपटाविषयी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. सुदैवाने आम्हाला सकारात्मक प्रतिक्रियाच अधिक मिळाल्याचे सौंदर्याने सांगितले. पुढे बोलताना सौंदर्याने म्हटले की, मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला खूप चांगले वाटते. कारण त्यांच्यासोबत काम करताना बºयाच गोष्टी शिकावयास मिळतात. मला केवळ वडील रजनीकांत आणि जिजू धनुष याच्याकडूनच शिकायला मिळाले असे नाही तर, ‘कोचडीयान’मधील जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री शोभना हिच्याकडूनही बºयाचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. यावेळी जेव्हा सौंदर्याला ‘व्हिआयपी-२’चे दिग्दर्शन करणे किती आव्हानात्मक होते? असे विचारण्यात आले, तेव्हा तिने म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास ‘व्हीआयपी-२’च्या तुलनेत ‘कोचडीयान’ अधिक आव्हानात्मक होता. कारण या चित्रपटात आम्हाला नव्या पद्धतीचा वापर करावा लागला. आम्हाला अगोदर ही पद्धत जाणून घ्यावी लागली त्यानंतर त्यावर काम करावे लागले. ‘व्हीआयपी-२’विषयी सांगायचे झाल्यास, मला याचे शूटिंग खूपच सहज वाटले. शूटिंगच्या सेटवर आम्ही खूपच हसत-खेळत वातावरण बघितले. असो, सौंदर्या सध्या वडील रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाविषयी खूप उत्साहित आहे. धनुष या चित्रपटाची धुरा सांभाळत असल्याने त्याच्याकडून काहीतरी नवे बघावयास मिळण्याची शक्यता आहे. यावेळी सौंदर्याने म्हटले की, ‘आप्पा’च्या (रजनीकांत) चाहत्यांप्रमाणेच मीदेखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.