अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतला आहे. इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंंड फुटतेय. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद, आलोक नाथ, अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. #MeToo ही मोहिम सध्या सोशल मीडियावर तर चांगलीच गाजत आहे. पण या अत्याचारांविरोधात आवाज उठवत असताना एक चुकीची आणि जुनी गोष्ट देखील व्हायरल झाली आहे. सायली भगत ही मिस इंडिया असून तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर काही आरोप केले असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मी अमिताभ बच्चन यांच्यावर कोणतेही आरोप केलेले नव्हते असे स्पष्ट मत सायली भगतचे आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मी गैरवर्तनाचे आरोप केलेले नाही, तुम्ही त्यांची बदनामी थांबवा अशी आता विनंतीच सायलीने केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सायलीच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये 2011 मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान मला अमिताभ बच्चन यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. पण असे काहीच घडले नसल्याचे सायलीचे म्हणणे आहे. मी सायबर क्राईमला बळी पडली असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या नावाचा वापर करून खोटी प्रेस नोट पसरवण्यात आली. त्या प्रेस नोटमध्ये नमूद केलेली कोणतीही गोष्ट मी सांगितलेली नाही. त्यामुळे कोणतीही बातमी प्रसारमाध्यमांनी चालवू नये. 2011 मध्येच उच्च न्यायालयाने सायबर क्राईमच्या केसमध्ये माझ्या बाजूने निकाल दिला होता. 2011 मध्ये द वीकेंड या चित्रपटाच्या लाँचिगला अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यामुळे त्याच्या पाया सायली पडायला गेली असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा मेसेज त्यावेळी व्हायरल झाला होता. पण या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कोर्टाने देखील मान्य केले होते.
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच साजिद खान, आर्य बब्बर, शायनी आहुजा यांच्या नावाने देखील खोटे मेसेजेस फिरत आहेत.