Join us

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिस बंदोबस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 2:35 PM

बाबा सिद्दीकी केवळ राजकारणातच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध होते.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन जणांनी गोळीबार केला. सिद्दीकी यांना बेशुद्ध अवस्थेत लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी सुमारे दोन तास डॉक्टरांनी सिद्दिकींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतू ते शुद्धीवर न आल्याने अखेर मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. याप्रकरणी मुंबई पोलिस अधित तपास करत असून मोठे खुलासे सातत्याने होत आहेत. यातच आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

बाबा सिद्दीकी केवळ राजकारणातच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध होते. ते सलमान खानच्या जवळ होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाहीये.

दरम्यान, सलमान हा गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेट लिस्टमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता. त्यानंतर  सलमानचे वडील सलीम खान यांना जाहीरपणे धमकावल्याची घटना घडली होती. 1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानच्या विरोधात आहेत.

बाबा सिद्दिकी हत्येची लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली आहे.  सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.  या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबांच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी संबंध होते. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावाही बिश्नोई गँगने केला आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडबाबा सिद्दिकी