आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. अशाच एका बड्या आणि स्टार कलाकाराच्या घराबाबत आपण जाणून घेणार आहोत. त्याला घर म्हणणं खरं तर अन्यायच होईल, कारण हा एक पॅलेस अर्थात आलिशान महल किंवा राजवाडा आहे.
गुडगाव इथून २६ किमीवर असलेल्या पतौडी इथं असणारा हा महल म्हणजे पतौडी पॅलेस. नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला.
इफ्तिकार अली हुसेन हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. इफ्तिकार अली हुसेन यांच्यानंतर नवाब घराण्याचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी परदेशी आर्किटेक्टच्या मदतीने पतौडी पॅलेसला आकर्षक डिझाईन केली.
ऑस्टेलियाचे आर्किटेक्ट कार्ल मोल्ट हेंज यांच्या संकल्पनेतून या भव्य आणि आलिशान महालाची डिझाइन करण्यात आली. टायगर पतौडी यांच्या पश्चात छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान हे या महालाची देखभाल करतात.
पतौडी पॅलेसला इब्राहिम कोठी असंही म्हटलं जातं. हा पॅलेस इतका आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. महालात भलीमोठी ड्रॉइंग रूम, एक देन नव्हे तर तब्बल सात बेडरूम आणि ड्रेसिंग रूम आहेत. या पॅलेसमध्ये तब्बल दीडशे खोल्या आहेत. बिलियर्डंस खेळण्यासाठी ७ बिलियर्डंस रुमही आहेत.
सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा दहावा नवाब आहे. त्यानेच २०१४ साली पतौडी पॅलेसचं नुतनीकरण केलं. सैफ आणि करिना कपूर खान इथं राहत नसले तरी पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी इथं येतात.
नुकताच करिनाचा वाढदिवसही इथं साजरा करण्यात आला. लिटील नवाब तैमूर अली खानचे या पॅलेसमधील फोटो समोर आले होते. सैफच्या या आलिशान महालात चित्रपटांचं शुटिंगही झालंय. मंगल पांडे, वीर-जारा आणि रंग दे बसंती या चित्रपटांचं शुटिंग या पतौडी पॅलेसमध्ये झालंय. टायगर पतौडी यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णकाळ इथं फोटोरुपात पाहायला मिळतात.