Join us

​श्रीदेवी यांच्यावरील सामान्य जनतेचे प्रेम पाहून कपूर कुटुंबीय गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 11:09 AM

श्रीदेवी या बॉलिवूडमधील पहिल्या सुपरस्टार होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. सदमा, लम्हे, चांदनी, नगिना ...

श्रीदेवी या बॉलिवूडमधील पहिल्या सुपरस्टार होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. सदमा, लम्हे, चांदनी, नगिना यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. शनिवारी रात्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांचे पार्थिव मुंबईत कधी आणले जाणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात होते. काल त्यांचे पार्थिव मुंबईत आणल्यानंतर त्यांच्या अनेक फॅन्सनी विमानतळाच्या बाहेर गर्दी केली होती. काल रात्रभर लोक श्रीदेवी यांच्या घराच्या बाहेर उभे होते. सकाळपासूनच श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी कित्येक तास रांगा लावल्या होत्या. श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला लाखोहून अधिक लोक उपस्थित होते. स्मशानभूमीच्या आत जाण्यास परवानगी नसल्याने झाडावर, इमारतीवर बसून आपल्या लाडक्या अभिनेत्रीची एक झलक पाहाण्याचा लोक प्रयत्न करत होते. लोकांची इतकी गर्दी पाहून श्रीदेवी यांचे कुटुंबीय देखील अवाक झाले होते. श्रीदेवी यांचे पार्थिव ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. ट्रकमध्ये बोनी कपूर, अनिल कपूर, संजय कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मोहित मारवाँ आणि कपूर कुटुंबियातील अनेक जण पार्थिवासोबत उभे होते. अनिल, अर्जुन अनेकवेळा ट्रकमधून वाकून बघताना दिसले. श्रीदेवी यांच्यासाठी जो जनसागर लोटला होता तो पाहून कपूर कुटुंब देखील अवाक् झाले होते. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.Also Read : श्रीदेवी यांच्या निधनामुळे बोनी कपूर झाले निशब्द