प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी थेट पाकिस्तानात केलेल्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. लाहोर येथे आयोजित फैज पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मंचावरुन सर्व पाकिस्तानी प्रेक्षकांसमोर २६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करत टीका केली होती. तर दुसरीकडे पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने(Ali Zafar) जावेद अख्तर यांच्यासमोर 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'हे गाणं गायलं होतं. तसंच त्याने जावेद अख्तर यांच्याप्रती आदर व्यक्त केला होता. याच कारणामुळे अली जफरला आता पाकिस्तानच्या जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
अली जफरने जावेद अख्तर यांच्यासाठी पोस्ट शेअर करताच पाकिस्तानी जनतेने त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. अलीने जावेद अख्तर यांच्यासमोर गुडघ्यावर बसत गाणं म्हणल्यानेही पाकिस्तानी जनतेला राग अनावर झाला. आपली टीका होत असल्याचे पाहताच अलीने स्पष्टीकरण दिले.दरम्यान त्याने जावेद अख्तर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणाही साधला.
अलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिले, 'मित्रहो माझे खरेच तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमचं प्रेम आणि टीका हे दोन्ही मी समान पद्धतीने घेतो. पण माझी नेहमीच एक विनंती आहे की कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्य तपासून पाहा. मी फैज महोत्सवात सहभागी नव्हतो त्यामुळे ते तिथे काय म्हणाले हे मला अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत माहित नव्हतं. मला पाकिस्तानी असल्याचा अभिमान आहे. कोणताही पाकिस्तानी त्याच्या देशाविरुद्ध आणि आपल्या लोकांविरुद्ध काहीच खपवून घेणार नाही हे स्वाभाविक आहे. आतंकवादामुळे पाकिस्तानने किती भोगलं आहे सहन केलं आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य नक्कीच भावना दुखावणारे आहेत.'
फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये जावेद अख्तर म्हणाले - 'आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही,' असे जावेद अख्तर म्हणाले.