फॅशन डिझायनर आणि सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह घटस्फोटामुळे चर्चेत आहे. 2022 मध्ये सीमा आणि सोहेलने 24 वर्षांचा संसार मोडला आणि एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत. सीमाच्या म्हणण्यानुसार घटस्फोटादरम्यान तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिला खूप साथ दिली. तिच्या मैत्रिणींचा मोठा आधार राहिला, त्यामुळेच ती आज खंबीरपणे उभी आहे.
एका पॉडकास्टमध्ये सीमा सजदेहने आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. सीमाला विचारण्यात आले की घटस्फोटामुळे तिला अडचणी आल्या का? यावर तिने सांगितले की, तिने तिच्या घटस्फोटाबाबत अश्लिल कमेंट्स केलेल्या वाचल्या आहेत. ज्यात म्हटलं गेले होते की सीमाने खान कुटुंबाचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि काम पूर्ण झाल्यावर तिने सोहेलला सोडले, असे त्यात म्हटले गेले होते.
सीमा म्हणाली, “माझ्या वडिलांना वाटते होते की, आता माझ्या मुलीची काळजी कोण घेईल? विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीत घटस्फोट हा कलंक मानला जातो. आपण सोशल मीडियाच्या युगात राहतो त्यामुळे मला लोकांकडून अशा प्रतिक्रिया मिळतात की, 'अरे, तिने त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा गरजेनुसार वापर केला, तिला जिथे पोहोयाचे होते तिथे ती पोहोचलीय आता. सीमाने सांगितले की, जेव्हा तिने हे सर्व वाचले तेव्हा तिला धक्काच बसला. सीमाने पुढे सांगितले की ती आणि सोहेल अनेक वर्षांपासून विभक्त झाले होते आणि एकत्र राहत नव्हते. "पण जगाला वाटले की आम्ही एकत्र आहोत."
सीमा म्हणाली, “मी त्याला का दोष देऊ, हा आम्हा दोघांचा निर्णय होता. आमचा मुलगा निर्वाण अशा वयात होता जेव्हा त्याला हे नको होते पण एक वेळ आली जेव्हा मला माझे लग्न आणि माझा मुलगा यापैकी एक पर्याय निवडावा लागला. माझा मुलगा त्या मार्गावरून जात होता ज्याची मला खूप भीती वाटत होती. मला जाणवलं की मला माझी सर्व एनर्जी एकतर हे लग्न टिकवण्यासाठी किंवा माझ्या मुलावर केंद्रित करायची आहे. तेव्हाच मी ठरवले आणि त्याला निवडले."
सीमा म्हणाली, “घटस्फोट हा कागदाचा तुकडा आहे, आम्ही बरीच वर्षे वेगळे राहत होतो आणि सर्व काही ठीक होते. मुलाने शिक्षणासाठी विद्यापीठात जाताना मला सांगितलं, ‘मम्मा, मी आता ठीक आहे, तू पुढे जाऊ शकतेस.’ त्या वेळी मला वाटले की घटस्फोट घेण्याची हीच योग्य वेळ आहे.