Join us

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 9:29 PM

आशा नाडकर्णी यांनी वयाच्या ८० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बातमी समोर येताच इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी वयाच्या ८० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठी ते हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्यांनी आज २९ जून २०२३ रोजी अखेरचा श्वास घेतला. निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. यासोबतच चाहतेही पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९५७ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते, त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आशा एक उत्तम नृत्यांगनाही होत्या. १९५७ ते १९७३ पर्यंत आशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचा भाग होत्या. आशा यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रुपेरी पडद्यावरचे काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. अशाच एक आशा नाडकर्णीही होत्या. आशाने 'मौसी' चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. त्यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी आणले. त्यांनीच आशा यांना 'वंदना' या चित्रपटात संधी दिली.यानंतर आशा यांनी 'नवरंग'सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

आशा नाडकर्णी यांचे लोकप्रिय चित्रपट

आशा नाडकर्णी यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले. या यादीत नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमांजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970), श्री बाळासाहेब (1964) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 

टॅग्स :बॉलिवूड