लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पश्चिमेकडील चित्रकूट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील साहित्याला शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता आग लागली. या दुर्घटनेत मनिष देवशी ( ३२) या तरुणाचा भाजून मृत्यू झाला. सिनेमाच्या सेटमधील बहुतांश साहित्य ज्वलनशील असल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजता अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर येथील एक हजार चौरस फूट परिसरावर आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, जल विभाग आणि अदानी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या परिसरातील सजावटीसाठीच्या साहित्याला आग लागली होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आठ फायर इंजिन, पाच जेटी, एक वॉटर टँकरची मदत घेण्यात आली. शिवाय घटनास्थळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली. दुपारी लागलेल्या आगीवर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. मात्र वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला पसरत असतानाच उठणारा धूर उंच आकाश लोटल्याने परिसर काळवंडला होता.
सेटवर लाइटिंगचे काम सुरूचित्रकूट मैदानावर बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी चित्रपट लव्ह रंजनचा सेट उभारण्यात आला होता. सेटवर लाइटिंगचे काम सुरू होते. त्यावेळी आग लागली. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट आहेत. त्याला आग लागलेली नाही.