Join us

शबाना आझमी यांना दारूची ‘होम डिलिव्हरी’ पडली महाग; नेमकं काय घडलं? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:46 PM

होय, घरबसल्या शबाना ऑनलाईन फसवणुकीच्या बळी ठरल्या. खुद्द शबाना यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देशबानांच्या या ट्विटरवर सध्या अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांच्यासोबतही अशीच फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. तर काहींनी यावरून शबानांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांना दारू घरपोच मागवणे महागात पडले. होय, शबाना यामुळे घरबसल्या ऑनलाईन फसवणूकीला बळी पडल्या. खुद्द शबाना यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.शबानांनी दारूच्या एका दुकानातून दारूची होम डिलिव्हरी मागवली होती. यासाठीचा अ‍ॅडव्हान्स पेमेंटही त्यांनी केला होता. ऑर्डर नोंदवली, ऑनलाईन पेमेंटही झाला. पण त्यांचे पार्सल काही घरी पोहोचले नाही. त्यांनी संबंधित दुकानाचा फोन लावला. मात्र त्यांच्या फोनला कुणीही प्रतिसाद दिला नाही. (Shabana Azmi cheated in online payment scam )

गुरूवारी शबाना यांनी  ट्विटरवर याची माहिती दिली. ‘सावधान, माझी Living Liquidz कडून फसवणूक झाली आहे. मी यांच्या दुकानातून लिकरची होम डिलिव्हरी मागविली होती. त्यासाठी मी पैसेही भरले होते मात्र दुकाने डिलिव्हरी केली नाही. इतकेच नाही, आता जेव्हा मी दुकानाच्या कथित नंबरवर कॉल करत आहे, तेव्हा माझे कॉलही कोणी घेत नाही.’ शबाना आझमी यांनी आपल्या ट्वीटमध्ये पेमेंटचे डिटेल्सदेखील शेअर केले आहेत, असे  ट्विट त्यांनी केले.

दरम्यान शबानांच्या या  ट्विटवर Living Liquidz ने लगेच रिप्लाय दिला. ‘मॅडम, गुगलवर दारूच्या दुकानांचे जे नंबर दाखवले जातात, ते 99 टक्के खोटे असतात. तुम्हाला Living Liquidz ने नाही तर सामान्य ठगबाजांनी फसवले आहे. कृपया पोलिसांत तक्रार करा आणि या मुद्याबद्दल लोकांना जागृत करा,’ असे त्यांनी लिहिले.शबानांच्या या ट्विटरवर सध्या अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांच्यासोबतही अशीच फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. तर काहींनी यावरून शबानांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

टॅग्स :शबाना आझमी