शगुफ्ता रफिक या लेखिकेने आशिकी 2, राज 3, मर्डर 2, जन्नत 2, वो लम्हे यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. त्याचसोबत तिने मो जाने ना या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. तिने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये तिची एक जागा निर्माण केली आहे. तिचा भूतकाळ अतिशय दुःखात गेला. तिला तिच्या बालपणापासून अतिशय वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. ती केवळ 17 वर्षांची असताना तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. त्यानंतर ती अनेक वर्षं बिअर बारमध्ये काम करत होती.
शगुप्ताचे बालपण हे इतर लहान मुलांसारखे नव्हते. तिला तिच्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. याविषयी शगुफ्तानेच एका मुलाखतीत सांगितले होते. तिने म्हटले होते की, माझी बहीण काम करून आमचे घर चालवत होती. पण तिच्या नवऱ्याने तिचा खून केला. मला माझ्या आईने दत्तक घेतले होते. त्यामुळे तिची काळजी घेणे हे माझे कर्तव्य असल्याची जाणीव मला लहानपणापासून होती. त्यामुळे घर चालवण्यासाठी मी केवळ 11 वर्षांची असताना एका प्रायव्हेट पार्टीत पहिला डान्स परफॉर्मन्स दिला होता. ती पार्टी केवळ पुरुषांसाठी होती आणि सगळ्यांनी प्रचंड मद्यपान केले होते. मी माझा दुपट्टा माझ्या कंबरलेा बांधला होता आणि मी वेड्यासारखी नाचत होती. लोक माझ्यावर पैसे उधळत होते. त्यावेळी मला प्रायव्हेट पार्टीत डान्स करायचे 700 रुपये मिळायचे. त्यामुळे मी उदरनिर्वाहसाठी ते करत होती. पण एका पार्टीत एका पुरुषाने मला हात लावण्याचा प्रयत्न केल्याने पार्टीत डान्स करायचे नाही असे माझ्या आईने मला ठणकावून सांगितले.
काही वर्षं गेल्यानंतर म्हणजेच मी 17 वर्षांची असताना केवळ काही पैशांसाठी मी लग्न न करताच एका श्रीमंत माणसासोबत राहायला लागले. पण त्याने माझा प्रचंड छळ केला. त्या नात्यातून मी कशीबशी बाहेर पडली. पण मी वेश्याव्यवसायाकडे वळले. त्यानंतर काही वर्षं मी बार डान्सर म्हणून काम करत होती. मला लिखाणाची प्रचंड आवड असल्याने मला भेटत असलेल्या लोकांविषयी मी त्याकाळात देखील लिहायची. मला महेश भट यांनी बॉलिवूडमध्ये दिलेल्या ब्रेकमुळेच माझे आयुष्य पूर्णपणे बदलले.