पौराणिक कथांवर सिनेमा बनवण्याचा सध्या ट्रेंडच सुरु झाला आहे. ओम राऊतच्या 'आदिपुरुष'नंतर आता नितेश तिवारीही 'रामायण' बनवण्याच्या तयारित आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) काही वर्षांपूर्वीच 'महाभारत'वर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे होते. मात्र बजेटच्या कारणामुळे तो फिल्म बनवू शकला नाही. आता पुन्हा एकदा शाहरुखचा तो जुना व्हिडिओ व्हायरल होतोय.
२०१७ साली बॉलिवूड लाईफशी बातचीत करताना शाहरुख म्हणाला, "अनेक वर्षांपासून महाभारत बनवायचं माझं स्वप्न आहे. पण मला वाटत नाही की माझ्याजवळ इतकं बजेट आहे. पण मी नक्कीच हे करु इच्छितो. जोपर्यंत मी कोलॅब करत नाही तोवर मला हे परवडणार नाही. यासाठी भारतीय निर्माते नाही तर आंतरराष्ट्रीय निर्मात्यांची गरज आहे. कारण भारतीय सिनेमा आणि निर्मात्यांचं मार्केट मर्यादित असतं."
तो पुढे म्हणाला, "या सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवावं लागेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅक्टिव्ह असलेलं कोणीतरी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. तुम्ही महाभारत म्हणून कमी बजेटवर काहीही छोटं मोठं बनवू शकत नाही. यासाठी बाहुबली स्केल किंवा त्यापेक्षा मोठं काहीतरी पाहिजे."
शाहरुख कोणा आंतरराष्ट्रीय निर्मात्यांच्या संपर्कात आहे का असं विचारलं असता तो म्हणाला, 'सध्या मी थोडा बिझी आहे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी महाभारतवर सिनेमा नक्की घेऊन येईल. मी काही लोकांशी बोललो आहे. सगळेच यासाठी उत्साहित आहेत.
शाहरुखच नाही तर एकदा आमिर खाननेही महाभारतावर सिनेमा बनवण्याच्या तयारित असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यासंदर्भातही आजपर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही. याशिवाय राजामौलींनीही ही इच्छा व्यक्त केली आहे.