शाहरूख खान (Shah Rukh Khan) व जुही चावला यांचा ‘राजू बन गया जेंटलमॅन’ (Raju Ban Gaya Gentleman ) हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. नुकतीच या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झालीत. याच चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाचे लेखक व सहाय्यक दिग्दर्शक मनोज लालवानी यांनी एक इंटरेस्टिंग माहिती शेअर केली. यानिमित्ताने शाहरूख खान व त्याची बायको गौरी खानच्या हनिमूनचं एक गुपित उलगडलं.
होय, दिल्लीत लग्न केल्यानंतर शाहरूख व गौरी दार्जिलिंगमध्ये हनिमूला गेले होते. आश्चर्य वाटेल पण या हनिमूनचा खर्च ‘राजू बन गया जेंटलमॅन’च्या निर्मात्यांनी उचलला होता. लालवानी यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
त्यांनी सांगितलं, शाहरूख व गौरीनं लग्न केलं, त्याच दिवसांत ‘राजू बन गया जेंटलमॅन’चं दार्जिलिंगमध्ये शूटींग होणार होतं. शाहरूखचं लग्न दिल्लीत झालं आणि त्यांनी दार्जिलिंगमध्ये हनिमून साजरा केला. मला आठवतंय की, ‘राजू बन गया जेंटलमॅन’चं संपूर्ण युनिट सेकंड क्लास ट्रेनने प्रवास करून दार्जिलिंगला पोहोचलं होतं. 36 तासांचा हा थकवणारा प्रवास होता. पण शाहरूख व गौरी यांना निर्मात्यांनी विमानाने पाठवलं होतं. दोघांच्या हनिमूनचा संपूर्ण खर्च ‘राजू बन गया जेंटलमॅन’च्या निर्मात्यांनी केला होता. विमान प्रवासापासून ते दार्जिलिंगमधील हॉटेलमधील वास्तव्यापर्यंत सगळा खर्च निर्मात्यांनी उचलला होता.
त्या दिवसांत दार्जिलिंगमध्ये प्रचंड थंडी होती. पण शाहरूख व गौरीच्या हॉटेल रूममध्ये हिटर नव्हतं. मी आणि दिग्दर्शक अझीझ मिर्झाही त्याच हॉटेलात थांबलो होतो. आमच्या रूममध्ये हिटर होतं. आम्ही लगेचच शाहरूख व गौरीच्या रूममध्ये हिटर पाठवण्याची व्यवस्था केली होती, अशी एक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
‘राजू बन गया जेंटलमॅन’ हा सिनेमा 1992 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरूख खान, जुही चावला, नाना पाटेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. अझीझ मिर्झा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट तुफान चालला होता.
त्यावेळी मी गरीब होतो...एका अवॉर्ड शोमध्ये शाहरूखने त्यांच्या हनिमूनचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता. ‘आपण हनिमूनसाठी पॅरिसला जाऊ, असं मी गौरीला सांगितलं होतं. पण माझ्याकडे विमानाच्या तिकीटासाठी पैसे नव्हते. मी त्यावेळी गरीब होतो. मी ‘राजू बन गया जेंटलमॅन’चं शूटिंग करत होतो. शूटींग दार्जिलिंगमध्ये सुरू होतं. त्यामुळे मी गैरीला पॅरिसला जाऊ सांगितलं अन् दार्जिलिंगला घेऊन गेलो,’असं शाहरूखने सांगितलं होतं.