बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान सध्या ‘झीरो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘झीरो’नंतर शाहरूख ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अशी खबर होती. या चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक नीरज पांडेसोबत शाहरूखची चर्चा झाल्याचे कानावर आले होते. या रिमेक व्हर्जनमध्ये शाहरूख खान विजय सतपथीने साकारलेली गँगस्टरची भूमिका करू इच्छितो, असेही कळले होते. अर्थात निर्मात्यांना मात्र वेगळेच काही हवे होते. शाहरूखने ‘विक्रम वेधा’मध्ये आर. माधवनने साकारलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करावी, असे निर्मात्यांचे मत होते. पण शाहरूखला गँगस्टरच्या भूमिकेतचं रस होता. नीरज पांडे आणि निर्मात्यांनी किंगखानला अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहरूख जुमानतचं नाहीये, म्हटल्यावर तेही मानलेत. ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये शाहरूख गँगस्टर बनणार आणि पोलिस अधिका-याची भूमिका आर. माधवनकडूनचं करून घेतली जाणार, असे यानंतर ठरले़. आता इतके सगळे झाल्यावर शाहरूख ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये १०० टक्के दिसणार, असेच कुणी मानेल. पण नाही़ बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, इतके सगळे झाल्यावर आता शाहरूखने या चित्रपटाला नकार दिला. याचे कारण म्हणजे, दिग्दर्शक. होय, ‘विक्रम वेधा’ पुष्कर आणि गायत्री या दिग्दर्शक जोडीने दिग्दर्शित केला होता. हिंदी रिमेकही हीच जोडी दिग्दर्शित करणार असे ठरले. पण ऐनवेळी शाहरूखला हिंदी रिमेक नीरज पांडे यांनी दिग्दर्शित करावा, अशी इच्छा व्यक्त केली. मग काय, या एका मुद्यावरून निर्मात्यात आणि शाहरूखमध्ये वाजले. यानंतर शाहरूखने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. आता शाहरूखच्या जागेवर दुस-या कुणाची वर्णी लागते, ते बघूच.