Divya Bharti Death Anniversary: दिव्या भारती (Divya Bharti ) हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात कोरलं गेलं आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने जगाचा निरोप घेतला. परंतु, या कमी जीवनप्रवासातही तिने बॉलिवूडमध्ये तिचं नाव अजरामर केलं. आपल्या सौंदर्यामुळे अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या दिव्या भारतीच्या निधनाविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. तिच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवादेखील पसरल्या. परंतु, तिचं निधन नेमकं कसं झालं याचं कोडं अद्यापही उलगडलेलं नाही. १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे ५ एप्रिलला दिव्या हे जग सोडून कायमची निघून गेली होती. तिच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. दिव्यासोबत काम करणाऱ्या शाहरूखसाठीही (Shah Rukh Khan ) हा मोठा धक्का होता. एका मुलाखतीत तो यावर बोलला होता. दिव्याच्या मृत्यूची बातमी शाहरूखला कशी मिळाली होती, ती बातमी ऐकून त्याची अवस्था कशी होती, हे त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं.१९९२ साली दीवाना या सिनेमाद्वारे शाहरूखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याच सिनेमाने त्याला दिव्या भारतीसारखी मैत्रिण दिली होती. या सिनेमात दिव्या शाहरूखची हिरोईन् होती.
काय म्हणाला होता शाहरूख...एनडीटीव्हीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान शाहरुख खान म्हणाला होता की, “ दिव्या भारती एक प्रतिभावान अभिनेत्री होती. ती एक प्रेमळ व्यक्ती होती. मला आठवतं, दीवाना सिनेमाचं डबिंग संपवून मी सी रॉक हॉटेलातून बाहेर पडत असताना, दिव्या समोरून येत होती. मी तिला हॅलो म्हणालो. यावर तू फक्त एक अभिनेता नाहीस तर एक संस्था आहेस, असं हसत हसत ती मला म्हणाली. तिच्या त्या वाक्याचा नेमका अर्थ तेव्हा मला कळला नव्हता. नंतर विचार केल्यावर ती किती मोठं वाक्य बोलून गेली होती, हे मला कळलं.”
अन् दिव्याच्या मृत्यूची बातमी समजली...दिव्याच्या मृत्यूबद्दल बोलताना शाहरूख म्हणाला होता,“त्या दिवशी दिल्लीच्या माझ्या घरी झोपलो होतो. अचानक दीवाना सिनेमाचं ऐसी दीवानगी हे गाणं जोरजोरात वाजू लागलं होतं. त्या गाण्याच्या आवाजाने मला जाग आली होती. मी उठलो आणि यानंतर दिव्या या जगात नसल्याची बातमी मला मिळाली. ती खिडकीतून पडल्याचं मला कळलं. मी शॉक्ड होतो. काहीही कळेनासं झालं होतं. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. कारण मला तिच्यासोबत दुसरा सिनेमा करायचा होता.” पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या भारतीचा मृत्यू हा एक अपघात होता. ५ एप्रिल १९९३ मध्ये मुंबईतील वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून दिव्याचा मृत्यू झाला होता. रात्री ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली होती. दिव्याचा अपघात झाल्यानंतर तिला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान तिचं निधन झालं होतं.