Pathaan Box Office Collection Day 2: सोशल मीडियावरची बायकाॅट मोहिम, वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टी याऊपरही शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा गर्दी खेचतोय. सगळ्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून प्रेक्षकांनी फक्त मनोरंजन निवडलं. याचमुळे केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात 'पठाण'ला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ५७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा 'पठाण'ला प्रचंड मोठा फायदा झाला आणि या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल ७० कोटींचा गल्ला जमवला. या ७० कोटींच्या कमाईचं आणखी खोलवर विश्लेषण केलं तर 'पठाण'ने काल २६ जानेवारीला दर तासाला कोट्यवधी रूपये कमावले.
होय, ट्रेड ॲनालिस्ट अतुल मोहन यांनी पठाणच्या कमाईचे दर तासाचे आकडे दिले आहेत. शाहरूखच्या पठाणचे कालचे बॉक्स ऑफिसचे आकडे सर्वांनाच थक्क करणारे आहेत. अतुल मोहन यांनी केलेल्या ट्विटनुसार, या चित्रपटाने काल २६ जानेवारीला दर तासाला सुमारे २.५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली. सेकंदाचा विचार कराल तर दर सेकंदाला चार लाखांवर रूपयांचा गल्ला जमवला.
‘पठाण’ने आतापर्यंत भारतात १२५ कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपट विकेंडपर्यंत तुफान कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत.
'पठाण' मध्ये शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. कदाचित शाहरुख,दीपिका आणि जॉनच्या करिअरमधला हा सगळ्या मोठा हिट सिनेमा ठरू शकतो. कारण शाहरुख,दीपिका,सिद्धार्थ आनंद ,जॉनच्या करिअरमधला हा ओपनिंग डे ला सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे.