मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली. महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन(Arjun Tendulkar)ने इंडियन प्रीमियर लीगच्या रविवारच्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. १९२ धावांचा यशस्वी बचाव करताना MI ने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा हा सामना १४ धावांनी जिंकला. अर्जुनने आज गोलंदाजीची सुरुवातही केली अन् शेवटही... त्याने शेवटच्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्यामुळे सर्वत्र त्याची प्रशंसा होताना दिसत आहे. नुकतेच बॉलिवूडचा पठाण म्हणजेच अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने याबद्दल ट्वीट केले आहे.
अर्जुन तेंडुलकरचा खेळ पाहिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्यासाठी ट्वीट करत कौतुक केले आहे. तसेच किंग खानने सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. त्याबरोबर त्याने अर्जुनला पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याने लिहिले की, आयपीएल कितीही स्पर्धात्मक असो… पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचा मुलगा अर्जुनला मैदानात उतरुन खेळताना पाहता, तेव्हा खूप आनंद वाटतो. ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट असते. अर्जुनला खूप खूप शुभेच्छा आणि सचिन… खरंच किती अभिमानाचा क्षण आहे. खूपच छान!
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना फारच रोमांचक ठरला. रोहित शर्माने मोठ्या विश्वासाने शेवटचे षटक अर्जुनला दिले आणि त्याने पहिल्या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या आणि आज त्याने २.५ षटकांत १८ धावा देऊन एक विकेट घेतली. अर्जुनने विकेट घेताच रोहित प्रचंड खूश झाला अन् त्याने अर्जुनला मिठी मारली. तेच आपल्या मुलाची कामगिरी ड्रेसिंग रुममध्ये बसून पाहणाऱ्या सचिनचीही छाती अभिमानाने फुलली.