Join us

सर्वांना भुरळ पाडणारी रोमँटिक सिग्नेचर स्टेप कशी लोकप्रिय झाली? शाहरुखनेच सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:59 AM

शाहरुखने लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची सिग्नेचर स्टेप कशी लोकप्रिय झाली याविषयी किस्सा सांगितलाय (shahrukh khan)

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. शाहरुखला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गेली अनेक दशकं शाहरुख विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. शाहरुखचे २०२३ मध्ये चार वर्षांनी दमदार कमबॅक केलं. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या सिनेमांमधून शाहरुखने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफिसवरही छप्परफाड कमाई केली. शाहरुखचं नाव घेतल्यावर सुरुवातीला डोळ्यासमोर येते ती त्याची आयकॉनिक सिग्नेचर पोज. दोन हात मोकळे सोडून शाहरुखचा रोमँटिक अंदाज या स्टेपमध्ये पाहायला मिळतो. ही स्टेप कशी लोकप्रिय झाली याचा किस्सा स्वतः शाहरुखने सांगितला आहे.

अशी लोकप्रिय झाली शाहरुखची सिग्नेचर स्टेप

शाहरुखला नुकताच लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार घोषित झाला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शाहरुख म्हणाला की, "एका गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान मॅडम करत होत्या. काही केल्या मला त्यांनी शिकवलेली डान्स स्टेप जमत नव्हती. मी संपूर्ण रात्र त्या डान्स स्टेपची रिहर्सल केली. पुढे दुसऱ्या दिवशी सरोज मॅडमने मला सांगितलं जर डान्स स्टेप जमत नसेल तर हात मोकळे सोडून फक्त उभा राहा. त्यानंतर मॅडमने जसं सांगितलं तसं मी केलं."

 

मी तुम्हा सर्वांना वेडं बनवतोय: शाहरुख

किंग खानने संवाद साधताना पुढे म्हटलं की, "मी एका वेगळ्या सेटवर गेलो. तिथेही मला डान्स करण्यासाठी थोड्या अडचणी येत होत्या. मी मग कोरिओग्राफरला विनंती केली की मी फक्त हात मोकळे सोडून उभा राहू शकतो का. कोरिओग्राफरने होकार देताच मी जास्त भावनिकरित्या ती पोज केली. पुढे मी या पोजला आणखी परफेक्ट बनवलं. मी तुम्हा सर्वांना इतके वर्ष वेडं बनवत आहे. हात सोडून रोमँटिक पोज देण्यामध्ये विशेष काही नाही."  शाहरुखला लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Pardo Alla Carriera या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड