2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी अतिशय कसोटीचं ठरलं. या वर्षात आलेले बॉलिवूडचे सर्व सिनेमे एकापाठोपाठ एक असे दणादण आपटले. अक्षय कुमार, आमिर खान अशा दिग्गज सुपरस्टार्सच्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अगदी साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या सिनेमाकडेही प्रेक्षक फिरकेनासे झालेत. बड्या बड्या बॅनरच्या चित्रपटांची अशी गत व्हावी, हे पाहून बॉलिवूडला धडकी भरली आहे. अगदी बादशहा शाहरूख खान (Shah Rukh Khan ) हा सुद्धा याला अपवाद नाही. होय, किंगखानला सुद्धा धडकी भरली आहे आणि यामुळे त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
चर्चा खरी मानाल तर हिंदी सिनेमे बॅक टू बॅक फ्लॉप होत असलेले पाहून शाहरूखने ‘डॉन 3’ (Don 3) रिजेक्ट केला आहे. बॉलिवूड हंगामाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, शाहरूखला ‘डॉन 3’ ऑफर केला गेला होता. पण तूर्तास त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहरूखला ‘डॉन 3’ची स्क्रिप्ट आवडली नाही, असं मुळीच नाही. फक्त एक अडचण होती. ती म्हणजे, शाहरूख स्क्रिप्टबद्दल पूर्णपणे कॉन्फिडन्स नव्हता. डॉन एक आयकॉनिक रोल आहे आणि शाहरूखला हा रोल करायचा आहे. पण स्क्रिप्टबद्दल कॉन्फिडन्स होईपर्यंत शाहरूखला काहीही निर्णय घ्यायचा नाही. आधीच बॉक्स ऑफिसची अवस्था वाईट आहे. अशात नवा चित्रपट साईन करण्याआधी त्याच्या यशाबद्दल शाहरूख पक्की खात्री करू इच्छितो. हेच कारण आहे की, शाहरूखने ‘डॉन 3’ला तूर्तास नकार दिला आहे.
शाहरूखच्या नकारानंतर फरहान अख्तरने या प्रोजेक्टवर नव्यानं काम सुरू केलं आहे. ‘डॉन 3’ची नवी स्क्रिप्ट घेऊन तो शाहरूखकडे जाईल आणि गोड बातमी ऐकायला मिळेल, अशी अपेक्षा करू या.
‘डॉन 3’ सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते. तोपर्यंत शाहरूखचे पठान, जवान व डंकी हे सिनेमे मात्र प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पुढील वर्षी शाहरूखचे हे तिन्ही सिनेमे रिलीज होणार आहेत.