बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाण आणि जवान या चित्रपत्रांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता डंकी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. शाहरुखने चाहत्यांना सोशल मीडिया अकाऊंटवरुन डंकीबाबत अपडेट्सही दिले आहेत. पुढील महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात दिसेल. बॉलिवूडचा बादशहा म्हणून शाहरुखची ओळख आहे, शाहरुखमुळे अनेकांना बॉलिवूडविश्वात संधी मिळाली असून काहींनी ते उघडपणे सांगितले होते. मात्र, शाहरुख खान लोकांचा वापर करुन घेतो, तो एकदम प्रोफेशनल आहे, असा आरोप गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी केला आहे.
शाहरुख हा बॉलिवूडचा किंग खान आहे, त्यामुळेच त्याच्या शब्दावर किंवा त्याच्यामुळे अनेकांना सिनेसृष्टीत नाव मिळालंय. कॉमेडियन कपिल शर्मानेही शाहरुखने केलेली मदत जाहीरपणे सांगितली होती. तर, गायक हनी सिंगनेही शाहरुखमुळे माझं करिअर बनलं, असे सांगत लुंगी डान्सच्या गाण्याच्या मेकींगचा किस्सा शेअर केला होता. मात्र, गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखवर गंभीर आरोप केला आहे. शाहरुख खान ही अतिशय कमर्शियल व्यक्ती असून तो दुसऱ्याचा वापर करुन घेतो, अशा शब्दात त्यांनी शाहरुखबद्दल विधान केलं.
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांत गाण्यांना आवाज दिला आहे. 'अंजाम' चित्रपटातील गाणे 'बड़ी मुश्किल है', 'येस बॉस' मधील 'मैं कोई ऐसा गीत गाऊं' आणि चित्रपट 'मैं हूं ना' मधील तुम्हें जो मैंने देखा' या गाण्यांना अभिजीत भट्टाचार्य यांनी गाायलं आहे. 'बिल्लू' हा शेवटचा सिनेमा होता, ज्यामध्ये गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखच्या सिनेमातील गाण्यासाठी आवाज दिला. आता, एका मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखबद्दल मोठं विधान केलंय.
शाहरुख आणि माझ्या व्यक्तीमत्त्वात मोठा फरक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, शाहरुख हा स्वत:च्या मेहनतीने पुढे आलाय, तो सेल्फमेड आहे, त्याच्यात सेल्फ रिस्पेक्ट आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी आहेत. मात्र, शाहरुख खान अतिशय कमर्शियल व्यक्ती आहे, तो इतरांचा वापर करुन घेतो आणि आपल्या यशाच्या मार्गात कोणालाही येऊ देत नाही, असे भट्टाचार्य यांनी म्हटले. तर, शाहरुखला अँटी नॅशनल म्हणणे चुकीचं आहे. अनेकांनी तसा प्रयत्नही केला. मात्र, शाहरुख खान प्रखर राष्ट्रवादी आहे. फिर भी दिल है हिंदुस्थानी, स्वदेस, अशोका यांसारख्या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे, असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले.