शाहरुख खान हा आज बॉलिवूडचा बादशहा आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभर त्याचे चाहते आहेत. शाहरुखचा नवीन चित्रपट कधी येणार याची ते आतुरतेने वाट पाहात असतात. तसेच शाहरुखच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्यांना नेहमीच इच्छा असते आणि शाहरुख देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. त्यामुळे फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे चाहते त्याला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
शाहरुख त्याच्या कामात, चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत असतो. त्यांच्या ट्वीटना देखील तो उत्तरे देतो. नुकतेच त्याच्या चाहत्याने त्याला केलेले एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शाहरुखच्या चाहत्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या गतिमंद भावाला शाहरुखने भेटावे अशी विनंती शाहरुखला करत आहे. तसेच मी हे ट्वीट १०० दिवसांपासून करत असल्याचे देखील त्याला सांगत आहे. हे ट्वीट पाहून शाहरुखने देखील आपल्या फॅनला रिप्लाय दिला आहे. त्याने म्हटले आहे की, अमित माफ कर मी हा व्हिडिओ याआधी पाहिलेला नव्हता. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग आणि लवकरच मला राजूशी कशाप्रकारे संपर्क साधता येईल हे मी पाहतो.
शाहरुख खान कितीही मोठा स्टार असला तरी तो आपल्या फॅन्ससाठी काहीही करायला तयार असतो आणि त्याचमुळे त्याचे फॅन्स त्याच्यावर प्रचंड खूश असतात.
अभिनेता शाहरुख खानने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याच्या फौजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. यामुळेच त्याला हेमा मालिनी यांनी दिल आशना है या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. त्याने दिल आशना है या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी दिवाना हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला असल्याने दिवाना त्याचा पहिला चित्रपट ठरला. आज त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम, डॉन, कुछ कुछ होता है, चक दे यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.