आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा बॉक्सिंगपटू डिंको सिंगच्या बायोपिकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. मात्र त्याआधीच डिंको सिंगवर आधारित बायोपिकसाठी शाहिदची निवड केल्यामुळे अनेकांकडून टीका होत आहे. या टीकांमुळे शाहिद नाराज झाला आहे.
डिंको सिंगच्या बायोपिकचे दिग्दर्शन राजाकृष्ण मेनन यांनी केले आहे. मात्र या भूमिकेसाठी ईशान्येकडील कलाकाराची निवड करण्यापेक्षा शाहिदची निवड का करण्यात आली यावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. डिंको हा ईशान्येकडील आहे मग ईशान्येकडील एखाद्या कलाकाराला संधी द्यायला हवी होती अशी टीका करण्यात येत आहे. मात्र या टीकांमुळे शाहिद काहीसा नाराज झाला आहे. उडता पंजाबमध्ये पंजाबी तरुणाची भूमिका मी साकारली होती. हैदरमध्ये काश्मिरी मुलाची भूमिका साकारली पण त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही मग आताच आक्षेप का ? आपण एका देशात राहतो, मग अमुक एका भागातील कलाकारानेच ती भूमिका साकारावी असा अट्टहास का? असा प्रश्नही त्याने विचारला आहे.मुळचे मणिपूरचे असणारे डिंको सिंग यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यांना २०१३ साली पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. त्यानंतर डिंको सिंग तरूण बॉक्सर्सना प्रशिक्षण देऊ लागले. २०१७ साली डिंको यांना कर्करोग झाला आणि त्यांना उपचारासाठी निधी जमवताना खूप त्रास झाला होता. शाहिद कपूरला डिंको सिंगची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक असून त्याला या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.