Shahid Kapoor on Arranged Marriage: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. शाहिद बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यानं अरेंज मॅरेज केलं आहे. शाहिद आणि करीना कपूरचं अफेअर प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर मात्र, शाहिदने थेट मीरा राजपूतसोबत अरेंज मॅरेज केलं. शाहिदसाठी मीराची निवड त्याच्या वडिलांनी पंकज कपूर आणि आई सुप्रिया पाठक यांनी केली होती. मीरा शाहिदपेक्षा जवळपास १३ वर्षांनी लहान आहे. शाहिद आणि मीरा यांची जोडी ही कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. विशेष म्हणजे अरेंज मॅरेज करणाऱ्या या जोडीमधील प्रेम पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटतो. अशातच आता शाहिदनं एका मुलाखतीत अरेंज मॅरेजबद्दल (Arranged Marriage)भाष्य केलं आहे.
शाहिद सध्या 'देवा' चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. 'देवा' चित्रपटात तो पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच त्याने स्क्रीन लाईव्हला मुलाखत दिली. यावेळी अरेंज मॅरेजबद्दल बोलताना तो म्हणाला, "विवाह चित्रपट खरं तर माझ्यासाठी एक सराव ठरला. माझ्या खऱ्या आयुष्यातही तसंच घडलं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी अरेंज मॅरेज करेल. मी कायम म्हणायचो की कुणी असं अरेंज मॅरेज कसं करू शकतं. मला विवाह चित्रपटातील काही दृश्य तर मजेशीर वाटली होती. पण, मलाही ते जवळजवळ दहा वर्षांनी हे जाणवलं".
पुढे तो म्हणाला, "आता मी अरेंज मॅरेजला पाठिंबा देतो. मला वाटतं माझ्यासाठी आणि मीरासाठी खूप चांगलं झालं". मीराबद्दल बोलताना शाहिद म्हणाला, "मला वाटते की मीराचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे आणि माझेही स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. तिने एक मोठा निर्णय घेतला होता की आधी मुलांना आणि नंतर करिअरला प्राधान्य द्यायचं. ते तिच्यासाठी व्यवस्थित पार पडलं".
शाहिद कपूर आणि मीरा यांना दोन मुले आहेत. पहिली मुलगी ज्याचे नाव मीशा कपूर आहे आणि दुसऱ्या मुलाचे नाव झैन कपूर आहे. मीरा आता तिचा स्वतःचा स्किनकेअर ब्रँड अकाइंड चालवते. शाहिद कपूरचा देवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिद पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. शाहिदचा एक वेगळा अॅक्शन अंदाज चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. 31 जानेवारीला त्याचा 'देवा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.