शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाहिदने अभिनयाची वाट धरली. २००३ साली 'इश्क विश्क' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या शाहिदने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. दमदार अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या शाहिदचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अभिनयाबरोबरच शाहिद फिटनेस आणि स्मार्टनेससाठीही ओळखला जातो. सध्या शाहिदचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र गोव्यात सुरू असलेल्या ५४व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल(IFFI)ची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या IFFI फेस्टिवलमध्ये बॉलिवूड सितारेही अवतरले होते. शाहिद कपूरनेही या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली होती. या फेस्टिवलमधील त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शाहिदने या फिल्म फेस्टिवलमध्ये त्याच्या डान्स परफॉर्मन्सने चार चांद लावले. शाहिदने जोशात येऊन अगदी भन्नाट डान्स केला. पण, हा डान्स करताना स्टेजवरच शाहिदचा तोल गेला आणि तो पडला. पण, स्टेजवर पडल्यानंतरही त्याने डान्स करणं थांबवलं नाही. लगेच उठून कमबॅक करत त्याने डान्स चालू ठेवला.
शाहिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, शाहिद अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ब्लडी डॅडी' सिनेमात दिसला होता. त्याची 'फर्जी' ही वेब सीरिज प्रचंड गाजली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं. लवकरच शाहिद नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.