अभिनेता शाहिद कपूरला 2019 हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरलं. त्याच्या 'कबीर सिंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. आता तो त्याचा आगामी सिनेमा 'जर्सी'चे शूटिंग करत आहे. या चित्रपटात शाहिदला आपल्याला एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण चंडीगढमध्ये सुरू असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान शाहिदला दुखापत झाली आहे.
पिंकव्हिला या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद क्रिकेट खेळतोय अशा एका दृश्याचे चित्रीकरण सुरू होते. पण चित्रीकरण करत असताना त्याच्या डोक्याला बॉल लागला आणि तो जखमी झाला. त्याला तातडीने चंडीगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला तब्बल 13 टाके पडले आहेत. पण त्याची प्रकृती आता चांगली असून त्याची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात येणार आहे.
शाहिदला दुखापत झाली असल्याची बातमी त्याच्या पत्नीला कळल्यानंतर आता मीरा चंडीगढमध्ये दाखल झाली असून ती सध्या त्याच्यासोबतच आहे.
‘जर्सी’ हा सिनेमा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. ‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. शाहिदचे वडील पंकज कपूरही यात कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आता हाच संघर्ष शाहिद कपूर पडद्यावर जिवंत करणार आहे. शाहिदचा हा सिनेमा 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.