ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
शाहिद कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रतिभावान अभिनेता आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत. कमीने, उडता पंजाब, जब वी मेट हे त्याचे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावले. पण परफेक्ट बॉडी, टॅलेंट आणि अनेक हिट चित्रपट देऊनही शाहिदच्या करिअरचा ग्राफ वेगाने घसरताना दिसतोय. होय, लवकरच शाहिदचा ‘कबीर सिंग’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण या चित्रपटानंतर शाहिदकडे एकही चित्रपट नाही. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द शाहिदने हा खुलासा केला.
‘सध्या माझ्याकडे काम नाही. कारण माझ्याकडे करण्यासाठी एकही चित्रपट नाही. मनातल्या मनात मला ही गोष्ट अस्वस्थ करतेय. पुढे मी काय करणार, हे मला ठाऊक नाही. अर्थात चित्रपट नसताना माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात,’असे शाहिद यावेळी म्हणाला.
तूर्तास तरी ‘कबीर सिंग’नंतर शाहिदकडे एकही चित्रपट नाही, हे वास्तव आहे. शाहिदच्या बोलण्यातून त्याची चिंता स्पष्टपणे दिसतेय. अर्थात ‘कबीर सिंग’ अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे आणि या चित्रपटाच्या यशावर शाहिदचे पुढचे करिअर अवलंबून असणार आहे.
‘कबीर सिंग’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. स्वभावाने अतिशय रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीर सिंगचा प्रेमभंग होतो आणि तो दारुच्या आहारी जातो, अशी थोडक्यात या सिनेमाची कथा आहे. संदीप वांगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूरसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय आणि अर्जुन बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा चित्रपट शाहिदच्या करिअरला कसा आणि कितपत सावरतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.