ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा सिनेमा यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेकी आहे. शाहिदच्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पण या चित्रपटावर तितकीच टीकाही झाली. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. अनेकांनी ‘कबीर सिंग’ हा ‘सेक्सिस्ट’ आणि महिलाविरोधी चित्रपट असल्याची टीका केली.
खरे तर ‘कबीर सिंग’ रिलीज होऊन बरेच दिवस झालेत. पण अद्यापही ही टीका थांबण्याची चिन्हे नाहीत. एका ताज्या मुलाखतीत शाहिद कपूर या टीकेवर बोलला. लोक ‘कबीर सिंग’च्या मागेच इतके हात धुवून का लागलेत? असा सवाल त्याने यावेळी केला.
‘कबीर सिंग’ हा सिनेमा एक अॅडल्ट सिनेमा होता आणि प्रौढ व्यक्ती चूक की बरोबर यातला फरक ओळखू शकतात. लोक ‘कबीर सिंग’वर टीका करत आहे. या टीका करणाºयांनी ‘बाजीगर’मध्ये शाहरूखने शिल्पा शेट्टीला मारले, तेव्हा प्रश्न केला नाही. ‘संजू’मध्ये रणबीर कपूरने सोनमच्या गळ्यात मंगळसूत्राऐवजी कमोड घातला, तेव्हा सवाल केला नाही. मग ‘कबीर सिंग’वरच इतके आरोप का? मिस्टर बच्चनने लोकांना चोरी शिकवली? असे या टीका करणाºयांना सांगायचे आहे का? तुम्ही चित्रपट बघत आहात, हे तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा चित्रपटातून काय घ्यायचे, काय नाही, याची निवड तुम्हालाच करायची आहे, असे शाहिद म्हणाला.
आम्ही दोन महिने ‘कबीर सिंग’चे प्रमोशन केले. ज्या लोकांनी या चित्रपटाचे तिकिट खरेदी केले, त्यांना चित्रपट पाहायचा होता. त्यांनी तो पाहिला, असेही तो म्हणाला.