Join us

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई; ९ दिवसांत कमावले १६३ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:27 PM

कबीर सिंगला सामान्य प्रेक्षकांकडून मिळालेल्या रिव्ह्यूजमुळे मोठा फायदा झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा हा चित्रपट कबीर सिंग बॉक्स ऑफिसवर  शानदार कमाई करत आहे. कबीर सिंगला सामान्य प्रेक्षकांकडून मिळालेल्या रिव्ह्यूजमुळे मोठा फायदा झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. याचमुळे नवव्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई करताना अक्षय कुमारच्या केसरी सिनेमाला मागे टाकले. इतकंच नव्हे तर कबीर सिंगने अजय देवगणचा सिनेमा टोटल धमालच्या एकूण कमाईलाही मागे टाकले आहे. 

कबीर सिंग हा शाहिद कपूरच्या आयुष्यातील सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी या सिनेमाने २०.२१ कोटी रुपये, शनिवारी २२.७१ कोटी, रविवारी २७.९१ कोटी रुपये, सोमवारी १७.५४ कोटी रुपये आणि मंगळवारी १६.५३ कोटी रूपयांची कमाई केली. बुधवारी या सिनेमाने १५.९१ कोटी, गुरूवारी १३.६१ कोटी कमावले. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या  शुक्रवारी या सिनेमाने १२.२१ कोटी रूपयांची कमाई केली. तर शनिवारी या सिनेमाने १७.१० कोटी रुपये कमावले. आतापर्यंत या सिनेमाने एकूण १६३.७३ कोटी रूपयांची कमाई केली आहे. 

कबीर सिंगने रिलीज झाल्यानंतर ३ दिवसांत ५० कोटी रुपये कमावण्याचा रेकॉर्ड केला होता. तर पाच दिवसांत हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला होता. या वर्षी रिलीज झालेल्या सिनेमांपैकी कबीर सिंग हा दुसरा वेगवान १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा सिनेमा आहे. इतकंच नव्हे तर ९ दिवसांत या सिनेमाने १५० कोटी रुपये कमावत नवा रेकॉर्ड केला आहे, तर १० दिवसांत या सिनेमाने १७५ कोटी रुपये कमावले आहेत. 

कबीर सिंग या चित्रपटात शाहिदने एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या सिनेमावर मुंबईतील एका डॉक्टरनं तक्रार दाखल केली आहे. या सिनेमात डॉक्टरर्सची प्रतिमा बिघडवण्यात आल्याचे मुंबईतील एका डॉक्टरचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टरने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय आणि सेन्सर बोर्ड ऑफ  फिल्म सर्टिफिकेशन यांना देखील पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रातून कबीर सिंग सिनेमाची स्क्रीनिंग थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. 

टॅग्स :कबीर सिंगशाहिद कपूरकियारा अडवाणी