अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) जेव्हा एखाद्या सिनेमाची घोषणा करतो, तेव्हा फॅन्स उत्सुक असतात. त्यांना वाटत असतं की, आता काहीतरी वेगळं बघायला मिळणार. 'पठाण'मुळे आधीच चर्चेत असलेल्या शाहरूखने आता त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'डंकी' (Dunki) असं या सिनेमाचं नाव असून प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिराणी यांचं दिग्दर्शन करणार आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज एकत्र काम करत आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
गेल्या चार वर्षात किंग खान शाहरूख खानचा एकही सिनेमा आलेला नाही. आता तो एकापाठी एक मोठमोठ्या सिनेमांचा घोषणा करत आहे. आधी यशराजच्या 'पठाण'ची घोषणा झाली. आता राजू हिराणीसोबत 'डंकी' (Dunki). तसेच अटलीसोबतही तो सिनेमा करत आहे. पण त्याचं टायटल अजून ठरलं नाही.
शाहरूख खान आणि राजकुमार हिराणी पहिल्यांदाच 'डंकी' च्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. याआधी 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमा शाहरूख खानला ऑफर झाला होता. पण काही कारणाने तो हा सिनेमा करू शकला नाही आणि हा सिनेमा संजय दत्तला मिळाला.
काय आहे 'डंकी'?
हा सिनेमा 'डंकी फ्लाइट' नावाने चर्चीत विषयावर आधारित असू शकतो. यात होतं असं की, जेव्हा एखादी व्यक्ती कायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही, तेव्हा ते बेकायदेशीर मार्गाचा वापर करतात. जेणेकरून ते त्यांच्या आवडत्या देशात जाऊ शकतील. हा प्रकार भारतात चांगलाच पॉप्युलर आहे. अनेक तरूण याद्वारे कॅनडा आणि यूएस मायग्रेट करतात. डंकी फ्लाइटचे संकेत सिनेमाच्या घोषणेसोबत शेअर केलेल्या टीझरमध्ये बघायला मिळत आहे. ज्यात वाळवंटात काही लोक लाइनने पाठीवर ओझं घेऊन जात आहे आणि त्यांच्यावरून एक विमान जात आहे.
शाहरूख खान या सिनेमाच्या घोषणेनंतर फारच आनंदी आहे. ट्विटरवर त्याने लिहिलं की, 'प्रिय राजकुमार हिराणी सर, तुम्ही तर माझे सॅंटा क्लॉज निघाले. तुम्ही सुरू करा, मी वेळेवर पोहचणार. इतकंच काय मी तर सेटवरच राहणार. फायनली तुमच्यासोबत काम करून मी उत्साहित आहे. २२ डिसेंबर २०२३ ला तुमच्यासाठी घेऊन येत आहे 'Dunki'.