बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान कोरोनाच्या संकटात सातत्याने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसतो आहे. त्याने त्याचे ऑफिसदेखील कोरोना रुग्णांसाठी दिले आहे. पुन्हा एकदा शाहरुख खान एका चिमुरड्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. खरेतर काही दिवसांपूर्वी बिहारमधील मुझफ्फपूर स्टेशनवर एका प्रवासी महिलेचा भुकेमुळे मृत्यू झाला होता. या महिलेचा निरागस मुलगा आईच्या मृतदेहावर घातलेल्या चादरीशी खेळत होता आणि आईला उठविण्याचा प्रयत्न करत होता. आता या मुलाच्या भविष्याची जबाबदारी शाहरुख खानने घेतली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या मीर फाउंडेशनने मुलाला आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहे. तो आता त्याच्या आजी-आजोबांकडे राहतो. मीर फाउंडेशनने ट्विट केलं आहे की, प्रत्येकाच्या हृदयात माणुसकी जागवणाऱ्या या व्हिडिओत तो आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलापर्यंत पोहचण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. आता आम्ही त्याला मदत करीत आहोत आणि तो त्याच्या आजोबांच्या देखरेखीखाली आहे.
अरविना खातून नावाची एक ३५ वर्षीय महिला रेल्वे स्थानकावर मृत असल्याचे दिसून आले होते. ही महिला आणि तिची दोन मुले २५ मे रोजी अहमदाबादहून श्रमीक स्पेशल ट्रेनने घरी जात होते.