Join us

पुन्हा कधी चालू शकेन माहित नाही...! अर्धांगवायूनंतर बदलले शाहरूखची को-स्टार शिखा मल्होत्राचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:42 AM

अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोनाची शिकार ठरली. कोरोनाला तर तिने परतवून लावले. पण अलीकडे तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला.

ठळक मुद्देशिखाने संजय मिश्रासोबत ‘कांचली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

नर्स होऊन कोरोना रूग्णांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा स्वत: कोरोनाची शिकार ठरली. कोरोनाला तर तिने परतवून लावले. पण अलीकडे तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. यात तिच्या शरीराचा डावा भाग पॅरालाईज्ड झाला आहे. या आजारातून शिखा मल्होत्रा बरी होत आहे पण स्वत:च्या पायावर उभं राहता येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अलीकडे एका मुलाखतीत शिखा तिच्या आजारपणावर बोलली.

‘मी माझ्या शरीरामुळे लाचार बनलीये. पण आत्ताही माझ्या कामाप्रति मी प्रचंड पॅशनेट आहे. माझ्या ‘कांचली’ या सिनेमाबद्दल विचार करते, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढते. ही वेळ माझ्यासाठी कसोटीची वेळ आहे. या काळात मला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. चाहत्यांकडून मला प्रेरणा हवी आहे. माझ्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतेय. पण मी पुन्हा कधी चालू शकेल, मला माहित नाही, ’ असे शिखा म्हणाली.

 कोरोना आणि लॉकडाउनदरम्यान शिखाने मुंबईतील जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये एक नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा केली होती. एक नर्स म्हणून तिने सहा महिने तिने सेवा दिली होती. रुग्णालयात रुग्णांना सेवा देताना आॅक्टोबर महिन्यात तिला कोरोनाची लागण झाली होती आणि बरी झाल्यानंतर २२ आॅक्टोबरला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर अचानक तिला अर्धांगवायूचा झटका आला. आधी शिखाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या रुग्णालयात उपचार महागडे असल्यामुळे नंतर तिला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले होते.

शिखाने संजय मिश्रासोबत ‘कांचली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याआधी 2014 मध्ये  तिने वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स पूर्ण केला होता. अर्थात हा कोर्स पूर्ण केल्यानंतरही तिने कधीच नर्स म्हणून काम केले नव्हते. पण कोरोनाच्या संकटात तिने गरजूंना आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला होता.शिखाने काही प्रसिद्ध सिनेमात काम केले आहे. फॅन या सिनेमात तिने शाहरुखबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे.  तापसी पन्नू बरोबर ‘रनिंग शादी डॉट कॉम’मध्ये ती दिसली होती.

अभिनय सोडून कोरोना रूग्णांसाठी ‘ती’ झाली नर्स... वाचून वाटेल अभिमान

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड