Join us

शाहरुखला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:13 AM

शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

ठळक मुद्देकर्नल राज कपूर यांनी १९८८ मध्ये ‘फौजी’ या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेत शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता.

शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री उशीरा निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.कर्नल राज कपूर यांची मुलगी रितम्भरा हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुधवारी रात्री १०.१० मिनिटाला माझ्या वडिलांनी अंतिम श्वास घेतला. ते काही दिवसांपासून रूग्णालयात होते. पण त्यांची तब्येत ठीक होती. बुधवारी अचानक त्यांचा मृत्यू झाला. अगदी शांततेत त्यांनी या जगाचा निरोप घेतला, असे रितम्भराने सांगितले. आर्मीमधून निवृत्त झाल्यानंतर कर्नल राज कपूर ओशोंचे शिष्य बनले आणि नंतर चित्रपटांत काम करण्यासाठी मुंबईत आलेत.

कर्नल राज कपूर यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती केली होती आणि अनेक जाहिरातीत काम केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे ‘व्हेन शिवा स्माईल’ नामक पुस्तक प्रकाशित झाले होते.

कर्नल राज कपूर यांनी १९८८ मध्ये ‘फौजी’ या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेत शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता. ही मालिका प्रचंड गाजली होती आणि याच मालिकेने शाहरूख नावारूपास आला होता. त्यामुळे अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत शाहरूखला लॉन्च करण्याचे श्रेय कर्नल राज कपूर यांना दिले जाते. पण स्वत: कर्नल राज कपूर यांनी कधीच याचे श्रेय लाटले नाही.   २० वर्षांपूर्वी मी शाहरूखला लॉन्च केले, असे मला लोक म्हणतात. मला श्रेय देतात. पण खरेच यात माझे काहीही योगदान नाही. मी शाहरूखला घडवले नाही तर त्याच्या आईवडिलांनी त्याला घडवले. मी फक्त माझ्या भूमिकेसाठी एक योग्य अभिनेता निवडला होता. ‘फौजी’च्या आधी आणि नंतर शाहरूखच्या आयुष्यात जे काही झाले, त्याचेशी माझा काहीही संबंध नाही, असे स्वत: कर्नल राज कपूर यांनी ‘एसआरके- 25 ईअर्स आॅफ अ लाईफ’ या समर खान लिखित पुस्तकातील प्रस्तावनेत म्हटले होते.

टॅग्स :शाहरुख खान