शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेमा पाहण्यासाठी ते आतुर झालेत. दमदार डायलॉग्स ही तर किंग खानची खासियत. ट्रेलरमध्ये शाहरुखचा असाच एक डायलॉग ऐकायला मिळतोय ज्यामुळे चाहत्यांना थेट एनसीबी झोनलचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची आठवण झाली आहे. नक्की काय आहे तो डायलॉग?
'जवान'च्या ट्रेलरच्या शेवटी शाहरुखचा एक डायलॉग कानावर पडतो. त्यात तो म्हणतो, 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर'. शाहरुखचा हा डायलॉग ट्विटरवर खूप व्हायरल होतोय. कारण हा डायलॉग ऐकून चाहत्यांना समीर वानखेंडेंचीच आठवण झाली आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात अडकला होता. तेव्हा समीर वानखेडेंनीच त्याला ताब्यात घेतलं होतं. दोन महिने आर्यन तुरुंगात होता. मुलाला झालेला त्रास पाहून शाहरुख खान खूप अस्वस्थ झाला होता. नंतर समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला होता. आर्यनचं हे प्रकरण खूप गाजलं होतं. आता शाहरुखने डायलॉगमधून समीर वानखेडेंनाच इशारा दिलाय का असा तर्क चाहत्यांनी लावलाय.
दुपारी १२ वाजता 'जवान'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु झाला. शाहरुख खान वडील आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपति खलनायकाच्या भूमिकेत आहे. तसंच साऊथ ब्युटी नयनतारा, प्रियमणि, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण यांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत.