बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'मन्नत' (Mannat) मध्ये गेल्या आठवड्यात २ तरुण गुपचुप घुसल्याची बातमी आली होती. आता या प्रकरणी नवीन अपडेट आली आहे. हे दोन्ही तरुण थेट मन्नत मधील मेकअपरुममध्ये लपून बसले होते.
बांद्रा बॅंडस्टॅंड येथील 'मन्नत' बंगल्यात शाहरुख आपल्या कुटुंबासह राहतो. बंगल्याची मॅनेजर कॉलीन डिसूझाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले, '२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मला सुरक्षा रक्षकांनी कळवले की २ तरुण बंगल्यात घुसले आहेत. दोघंही तिसऱ्या मजल्यावरील मेकअपरुमपर्यंत पोहोचले होते. आश्चर्य म्हणजे ते रात्री तीन वाजताच घुसले आणि तेव्हापासून शाहरुखची वाट पाहत होते.'
मन्नत बंगल्याच्या स्टाफपैकी एक सतीश जेव्हा साफसफाईसाठी मेकअपरुममध्ये पोहोचला तेव्हा त्याने दोघांना तिथे पाहिले. त्यानंतर सतीशने दोघांना लॉबीमध्ये नेले. त्यांना पाहून शाहरुखही आश्चर्यचकीत झाला. त्यानंतर सुरक्षारक्षक आले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या तरुणांचे नाव पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह असे आहे. दोघेही गुजरातच्या भरुचमधून शाहरुखला भेटण्यासाठीच मुंबईला आले होते.
Pathaan Movie : कोट्यधीश 'पठाण'! 40 व्या दिवशीही घोडदौड सुरुच, अक्षयचा 'सेल्फी' मात्र आपटला
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही तरुणांकडे काहीही संशयास्पद आढळले नाही. ते घरी न सांगता शाहरुखला भेटायचं म्हणूनच आले होते. दोघांच्या कुटुंबियांना बोलावण्यात आलं. १० हजार रुपयांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली.
शाहरुख खान लवकरच 'जवान' सिनेमात दिसणार आहे. याचे शूटिंग सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.