सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या 'जवान' या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती ही किंग खान करणार आहे. शाहरुख खानने 'जवान' तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. 'जवान' हा किंग खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, "जवान हा शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. जवान 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. जवानचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली कुमार यांनी केले आहे. दिग्दर्शक आणि शाहरुख खान पहिल्यापासूनच स्पष्ट होते की त्यांना भारतातील सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट बनवायचा आहे. रुपेरी पडद्यावर सर्व काही खरे वाटावे म्हणून मोठ्या सेटमध्ये चित्रपटाचे अॅक्शन सीन शूट केले आहेत. मात्र, थोडा विलंब आणि पुन्हा शूटिंगमुळे चित्रपटाची किंमत वाढली असली तरी चित्रपट अधिक प्रभावी आणि स्टायलिश बनवण्यासाठी हे सर्व करण्यात आले.
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये होते आणि रिलीज झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले होते. 'पठाण' हा शाहरुख खानच्या करिअरमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी आहे. किंग खानचा 'पठाण' हा पहिला सिनेमा आहे, ज्याने भारतात 500 कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात 1050 कोटींची कमाई केली होती.
‘जवान’ हा हिंदीतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, त्याने त्याचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून सह-लिखित आणि दिग्दर्शित केलेला आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमात दीपिका पादुकोणचाही कॅमिओ रोल आहे. तर मराठी अभिनेत्री गिरीजा ओकचीही यामध्ये भूमिका आहे. ७ सप्टेंबर रोजी 'जवान' प्रदर्शित होतोय.