बॉलिवूडचा 'किंग' खान शाहरुख याचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खानने आपल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असं लोकांचं स्वप्न असतं. अभिनेते अनेकदा लग्नाच्या विविध पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात आणि परफॉर्म करतात. आता शाहरुख खान दिल्लीत एका लग्नाला पोहोचला होता आणि त्याने परफॉर्मन्सही दिला. या लग्नातील त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मेकअप आर्टिस्ट अमृत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शाहरुख खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख हा वधू-नवऱ्यामुलासोबत परफॉर्म करताना दिसतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लग्नात परफॉर्म करण्यासाठी शाहरुखने किती पैसे घेतले, असा प्रश्न केलाय. यावर मेकअप आर्टिस्ट अमृत कौरने उत्तर दिले. तिने लिहलं, 'तो फॅमिली फ्रेंड आहे'.
दरम्यान, या लग्नात शाहरुखने परफॉर्म करण्यासाठी पैसे घेतले की नाही, हे समोर नाही. पण, एका रिपोर्टनुसार, शाहरुख खान एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये घेतो. शाहरुख अशा अनेक लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म करतो. त्याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरलही झालेले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे लग्नाच्या विविध पार्ट्यांमध्ये, खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करून बक्कळ कमाई करत आहे. अलिकडेच अक्षय कुमारनेही एका लग्नात गाणं गायलं होतं.