प्रियांका चोप्राचे निक जोनास सोबत काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्या दोघांना आपल्याला एकत्र पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील ते दोघे त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. निकसोबत लग्न करण्याआधी प्रियांकाच्या अनेक अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा झाली होती.
प्रियांकाने डॉन या चित्रपटात खूप चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या वेळेस शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. पण या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये प्रियांकाने प्रवेश करण्याआधीच तिची शाहरुख खानसोबत भेट झाली होती.
प्रियांका चोप्रा ही मिस वर्ल्ड असून मिस इंडिया स्पर्धेच्यावेळेस परीक्षकांमध्ये शाहरुख खान देखील होता. फेमिना मिस इंडिया २००० च्या शेवटच्या १० स्पर्धकांमध्ये प्रियांका चोप्राचा समावेश होता. मिस इंडियाच्या वेळी शाहरुखने परीक्षक म्हणून तिला एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न थेट तिच्या खाजगी जीवनाविषयी होता. त्याने विचारले होते की, तुला कोणासोबत लग्न करायला आवडेल... एखादा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. ज्याने आपल्या देशाचे नाव उंचावले आहे की एखाद्या व्यवसायिकासोबत, जो तुला संपूर्ण जग फिरवेल, तुला महागाचे दागिने, घर भेटवस्तू म्हणून देईल की माझ्यासारख्या हिंदी इंडस्ट्रीतील नायकासोबत...
प्रियांकाला विचारण्यात आलेला हा प्रश्न अतिशय कठीण होता. पण तिने क्षणाचाही विलंब न लावता सांगितले होते की, मला एखाद्या खेळाडूसोबत लग्न करायला आवडेल. भारतासाठी त्याने विजय मिळवल्यानंतर तो जेव्हा घरी परतेल, त्यावेळी मला देखील तुझ्याविषयी प्रचंड अभिमान असल्याचे मी त्याला सांगेन.
प्रियांकाने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता त्यावेळी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मलायका अरोराने केले होते. प्रियांकाच्या या उत्तरावर सगळेच परीक्षक प्रचंड खूश झाले होते. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतरच बॉलिवूडचे दरवाजे प्रियांकासाठी खुले झाले.