कुणी त्याला बादशाह म्हणतं तर कुणी रोमान्सचा किंग… आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली. हाच किंग संपत्तीबाबतही खराखुरा किंग असल्याचं समोर आलं आहे.
एका इंग्रजी वेबवसाईटनुसार २०१९ या वर्षात शाहरुखची एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे. शाहरुख वांद्रे इथल्या ज्या बंगल्यात राहतो त्या आलिशान मन्नत बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटीच्या घरात आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे. शाहरुखकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.
यांत ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा गाड्यांचा समावेश आहे. आयपीएलच्या केके आर संघाचा सहमालक आहे. त्याच्याकडे या संघाच्या मालकीचे ५५ टक्के शेअर असून त्याची किंमत जवळपास ५७५ कोटी इतकी आहे. शाहरुखची रेड चिलीज ही कंपनी असून त्याची वार्षिक उलाढाल ५०० कोटींच्या घरात आहे.