शाहरूख खानने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 28 वर्षे पूर्ण केलीत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्याने अनेक शानदार सिनेमांत काम केले आणि टीव्ही ते बॉलिवूड अशी यशस्वी घोडदौड करत ‘किंगखान’ बनला. याच शाहरूखला ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा आठ ऑस्कर जिंकणारा सिनेमाही ऑफर झाला होता. विशेष म्हणजे, चित्रपटात काम करायलाही त्याने सुरुवात केली होती. पण ऐनवेळी शाहरूखने या चित्रपटाला नकार दिला आणि त्याच्याजागी अनिल कपूर यांची वर्णी लागली होती. आता शाहरूखने हा सिनेमा का नाकारला होता तर त्यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे.
२०१० मध्ये ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुद्द शाहरूखने याचा खुलासा केला होता. ‘स्लमडॉग मिलेनियर’ची ऑफर का नाकारली, असा प्रश्न त्याला विचारला गेला होता. यावर शाहरूखने सांगितले होते की, ‘स्लमडॉग मिलेनियर’चा दिग्दर्शक डॅनी माझा चांगला मित्र आहे. चित्रपटाची कथा मला आवडली होती. मी कथा ऐकताक्षणीच चित्रपटाला होकार दिला होता. पण पुढे मीच चित्रपटाला नकार दिला. याचे कारण म्हणजे, मला ज्या होस्टची भूमिका मला देण्यात आली होती, तो स्वार्थी आणि फसवणूक करणारा होता. मी आधीच ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट केला होता. अशात मला सुद्धा लोक चित्रपटातील या होस्टसारखाच मतलबी व स्वार्थी समजतील, असे मला वाटले होते. या भूमिकेमुळे माझी इमेज खराब होईल,अशी भीती मला होती. त्यामुळेच ऐनवेळी मी या सिनेमाला नकार दिला होता.
‘स्लमडॉग मिलेनियर’ने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले होते. जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. यात अनिल कपूर यांच्यासोबत इरफान खान, सौरभ शुक्ला, देव पटेल असे अनेक कलाकार होते. या सिनेमाचे शूटींग मुंबईत झाले होते.