बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या (Shahrukh Khan) रेड चिलीज एंटरटेन्मेंट (Red Chillies Entertainment) प्रोडक्शनच्या नावाने ऑनलाईन फसवणूक होत आहे. याबाबतची माहिती रेड चिलीज कडूनच देण्यात आली आहे. काल बुधवारी रात्री शाहरुख आणि गौरी खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर करत ऑनलाईन प्रसारित होणारे नोकरीसाठीचे मेसेज आणि ऑफर खोट्या असल्याचे सांगितले.
रेड चिलीज एंटरटेन्मेंटने पोस्ट शेअर करत लिहिले, "महत्वपूर्ण सूचना. आमच्यात माहितीत असे आले आहे की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषत: व्हॉट्सअॅपवर रेड चिलीजच्या नावाने खेटे ऑफर प्रसारित होत आहेत. आम्ही स्पष्ट करु इच्छितो की रेड चिलीज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोकरी किंवा अन्य ऑफर्सची माहिती देत नाही. केवळ अधिकृत माध्यमांमधूनच या गोष्टी प्रसारित केल्या जातात."
शाहरुखच्या रेड चिलीजच्या नावाने याआधीही असे मेसेज व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर फसवणूकीचं प्रमाण वाढतंय. अनेक नावाजलेल्या प्रोडक्शन्सच्या नावाखाली ही फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळतंय. याआधी विद्या बालनच्या नावानेही पैसे उकळण्याचं, सिनेमाची ऑफर देण्याचं समोर आलं होतं.