Join us

शाहरुखची पत्नी गौरी खानला मिळाली ED ची नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 5:44 PM

कोणत्या प्रकरणात गौरी खानला मिळाली ED ची नोटीस?

Gauri Khan ED Notice: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) अडचणीत सापडली आहे. तिला ईडी (ED)ने नोटीस पाठवली आहे. रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची गौरी ब्रँड अँबेसिडर आहे. 2015 मध्ये तिला लखनऊच्या या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर बनवले गेले. या कंपनीने बँक आणि अन्य गुंतवणूकदारांचे 30 कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. याच कारणाने गौरी खानही ईडीच्या रडारवर आली आहे. 

तुलसियानी ग्रुपविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात लवकरच गौरी खानचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कंपनीशी गौरीने कधी करार केला आणि यासाठी तिला किती पैसे मिळाले असे प्रश्न तिला विचारले जातील. लखनऊच्या ईडी युनिटने तिला नोटीस पाठवली असून याप्रकरणी तिचा जबाब घेण्याची गरज आहे. 

नक्की काय होतं प्रकरण?

याचवर्षी मार्चमध्ये हे प्रकरण पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. लखनऊ स्थित सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रोजेक्ट आहे. याच प्रोजेक्टमध्ये मुंबईच्या किरीट जसवंत शाह या व्यक्तीने 2015 साली फ्लॅट खरेदी केला होता. याची किंमत 85 लाख रुपये होती. मात्र त्याला पैसे दिल्यानंतरही हा फ्लॅट मिळालाच नाही. त्यामुळे त्याने तुलसियानी ग्रुप आणि गौरी खान विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारकर्त्याने सांगितले की, गौरी खान या प्रोजेक्टची जाहिरात करते. तिच्यापासून प्रेरित होऊनच त्यांनी तो फ्लॅट खरेदी केला होता.  

गौरी खानविषयी

गौरी खान स्वत: एक सेलिब्रिटी इंटिरियर डिझायनर आहे. तिने अनेक बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर, प्राॉपर्टी डिझाईन केल्या आहेत. 'गौरी खान डिझाईन्स' नावाने तिचा बिझनेस आहे. शाहरुख प्रमाणेच गौरीही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

टॅग्स :गौरी खानअंमलबजावणी संचालनालयशाहरुख खान