शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' असे सलग तीन सुपरहिट चित्रपट देत आपणच बॉक्सऑफिसचा किंग असल्याचं त्याने सिद्ध केलं. मात्र शाहरुखसाठी त्याआधीची काही वर्षे खूपच कठीण होती. फक्त त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या कुटुंबासाठीही तो कठीण काळ होता. त्या काळात शाहरुख माध्यमांसमोर आलाच नाही आणि त्याने जाहीरपणे काहीही बोलणे टाळले. नुकतंच त्या सर्व प्रसंगाविषयी शाहरुख पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला आहे.
न्यूज 18 च्या एका कार्यक्रमात शाहरुख खान म्हणाला, 'मागची ४-५ वर्षे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच कठीण होती. कोव्हिडचा काळ तर सर्वांसाठीच कठीण होता. माझे अनेक चित्रपट तर फ्लॉपच झाले. चित्रपट समीक्षकांनी माझ्याबद्दल वाईट छापण्यासही सुरुवात केली. माझं स्टारडम आता संपलं असंही लोक म्हणत होते. पण मला यामुळे काहीच फरक पडत नाही."
कठीण काळाने काय शिकवलं?
शाहरुख पुढे म्हणाला,'माझ्या वैयक्तिक आयुष्यातही काही अघटित आणि मनाला ठेच पोहोचवणाऱ्या घटना घडल्या ज्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. यातून मी एकच शिकलो की शांत राहायचं, एकदम शांत आणि प्रामाणिकपणे काम करायचं. जेव्हा आपण विचार करतो की सगळं काही ठीक सुरु आहे तेव्हाच अचानक असं काही घडतं की तुम्हाला धक्का बसतो.' शाहरुखच्या म्हणण्याचा अर्थ त्याचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स केससंबंधित होता. आर्यन खान 2021 साली क्रूझ ड्रग्स केसमध्ये अडकला होता.
तो म्हणाला, 'पण हीच ती वेळ आहे जी तुम्हाला आशावादी, आनंदी आणि प्रामाणिक स्टोरीटेलर बनवते. तुम्ही जे करत आहात ते करत राहा आणि असा विचार करा की हा एका वाईट कहाणीचा वाईट ट्विस्ट आहे. ही ती कहाणी नाही जी तुम्ही जगत आहात आणि हा कहाणीचा १०० टक्के शेवटही नाही. मला कोणीतरी सांगितलं होतं की आयुष्यात सिनेमांसारखंच शेवटी सगळं काही ठीक होतं. जर ठीक नाही झालं तर तो शेवट नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! आणि मी यावर विश्वास ठेवतो कारण मला वाटतं चांगल्यातूनच चांगल्याचा जन्म होतो."
2024 मध्ये शाहरुखचा कोणता सिनेमा येणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. पण चर्चा ही आहे की शाहरुख सलमानसोबत 'टायगर व्हर्सेस पठाण' चं शूटिंग सुरु करेल.