1992 साली जेव्हा 'दिवाना' सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा कोणाला वाटलं होतं का की सिनेमातील दुसऱ्या हिरोची भूमिका साकारणारा हा साधा मुलगा एक दिवस बॉलिवूडचा किंग बनेल. मेहनत आणि जिद्दीने त्याने हे यश मिळवलं. शून्यातून विश्व उभं केलं. सोबतच मुंबईतील 'मन्नत'सारखा आलिशान बंगलाही खरेदी केला. पण हा बंगला खरेदी केल्यानंतर शाहरुखकडे पैसेच राहिले नाहीत असा खुलासा शाहरुखने नुकताच केला आहे.
शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी गौरी खानच्या (Gauri Khan) 'my life in design' या पुस्तकाचे नुकतेच अनावरण झाले. यावेळी आपल्या पत्नीला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख स्वत: उपस्थित होता. प्रकाशनादरम्यान शाहरुखने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, "त्यावेळी मी ताज जवळ असलेल्या माझ्या दिग्दर्शकाच्या बंगल्यात राहत होतो. जोपर्यंत शूटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तिथे राहणार होतो. तेव्हाच आम्हाला मन्नतविषयी समजले. पण मन्नत खरेदी करणं स्वप्नातच शक्य होतं कारण तेव्हा इतके पैसे नव्हते. तरी काही वर्षांनी आम्ही बंगला खरेदी केला."
तो पुढे म्हणाला, "तेव्हा बंगला तर खरेदी केला पण त्याच्या मेन्टेनन्ससाठी आणि डिझाईन करण्यासाठीचे पैसेच नव्हते. डिझायनरला बोलावले पण खर्च खूपच जास्त येणार होता. तेव्हा मी गौरीला म्हणलं आता तूच हे डिझाईन करु शकतेस. बस त्यानंतर जसेजसे पैसे आले गौरीच्या हिशोबाने वस्तू घरात आल्या. हळूहळू बंगल्याचं डिझाईन होत गेलं."
शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची आजची किंमत तब्बल 200 कोटी रुपये आहे. तर त्यावेळी शाहरुखने 13 कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता. असा बंगला खरेदी करणं आता प्रत्येकाचं केवळ स्वप्नच असू शकतं.