बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' असे बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट त्याने दिले. सलग चार वर्ष फ्लॉप ठरल्यानंतर त्याने ब्लॉकबस्टर सिनेमांमधून कमबॅक केले. शाहरुखने नुकतीच 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024' मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने फ्लॉप सिनेमांवर दिलखुलास चर्चा केली. तसंच एकामागोमाग चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो कुठे गायब होता याचाही त्याने खुलासा केला.
शाहरुख खान 2018 ते 2022 हे चार वर्ष गायब होता. या काळात तो नक्की काय करत होता असा प्रश्न विचारला असता शाहरुख म्हणाला, "मी त्यावेळी जगात भारी पिझ्झा बनवायला शिकलो. मी स्क्रीप्ट ऐकणंच बंद केलं होतं. मी एक छोटंसं किचन बनवलं होतं जिथे मी फक्त पिझ्झा बनवायचो. यासोबतच सहनशीलता शिकलो. कारण एक गोल पिझ्झा बनवण्यापूर्वी मी अनेक चौकोनी आकाराचे पिझ्झा बनवत होतो."
तो पुढे म्हणाला, "त्या काळात मला कुटुंबाने मोलाची साथ दिली. ते मला असं कधीच म्हणाले नाहीत की तुझे चित्रपट तुझ्या पिझ्झा इतकेच वाईट आहेत. किंवा असंही नाही म्हणाले की तू बनवलेले पिझ्झा जास्त चांगले आहेत त्यामुळे चित्रपट करणं बंद कर. उलट ते म्हणाले की तुझ्या सिनेमांसारखेच ती बनवलेले पिझ्झाही उत्तम आहेत. त्यांनी मला खूप आत्मविश्वास दिला. विशेषत: माझ्या मुलांनी आणि टीमने खूप साथ दिली. मग मी परत अॅक्टिव्ह झालो. मी परफेक्शन बघत होतो म्हणून फेल झालो. प्रेक्षकांना काय हवं आहे हे मला बघायचं होतं."
शाहरुखने मान्य केली चूक
"प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे हे ऐकणं मी बंद केलं होतं ही माझी चूक मान्य करतो. मी जिथे जायचो तिथे हजारो लोक माझ्यासाठी आलेले असायचे पण मला हे कळलं नाही की त्यांना नक्की काय हव आहे, असंही तो म्हणाला."